परभणीच्या गंगाखेड शहरातील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : अज्ञात चोरट्यानी पान टपरी फोडून सिगारेट, बिडीसह तब्बल ६७९०० रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना गुरुवार ३० जानेवारी रोजीच्या पहाटे शहरातील परळी नाका परिसरात घडली. याप्रकरणी शुक्रवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील महाराणा प्रताप चौक परळी नाका परिसरातील स्वराज डेली निडस अँड पान शॉप चालक शुभम दिगंबर निरस हे बुधवार २९ जानेवारी रोजी रात्री पान शॉप बंद करून घरी गेले असता गुरुवार रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या पान शॉपच्या वरील बाजूचा टिन पत्रा कापून आत प्रवेश करत गोल्ड फ्लॅक सिगारेटचे पाच पुडे, ब्रिस्टॉल सिगारेटचे तीन पुडे, मोठी गोल्ड सिगारेटचे चार पुडे, लाईट गोल्ड सिगारेटचे तीन पुडे व मजूर बिडीचे ४८ पुडे असा अंदाजे एकूण ६७९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही बाब गुरुवार रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शुभम दिगंबर निरस वय २८ वर्ष रा. पडेगाव ता. गंगाखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार ३१ जानेवारी रोजी (Gangakhed Crime) गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन याचा पुढील तपास जमादार मारोती माहोरे हे करीत आहे.
व्यापारी वर्गात भितीचे वातावरण
गंगाखेड शहरातील प्रमुख चौक असलेल्या परळी नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी पान टपरी फोडून हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.
चोरटा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद
परळी नाका परिसरातील पान टपरी फोडून सिगारेट व अन्य साहित्य पोत्यात भरून घेऊन जाणारा चोरटा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असुन तो चोरटा जेरबंद केंव्हा होणार याकडे व्यापाऱ्यांसह शहर वासियांचे लक्ष लागले आहे.