"पुढारी कल्याण-डोंबिवली आयकॉन" या पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलताना मंत्री गणेश नाईक.Pudhari Photo
Published on
:
31 Jan 2025, 5:52 pm
Updated on
:
31 Jan 2025, 5:52 pm
डोंबिवली : आपण 15 वर्षे ठाणे-पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आपण लोकांना द्यावे आणि विसरावे या मताचा मी आहे. जो माणूस सद्भभावनेने, सत्याने जगतो, त्याचे कामही समाजाच्या लक्षात राहते, दैनिक पुढारीने समाजातील अशाच सन्मानमूर्तीचा सन्मान केला आहे, या सन्मानमूर्तींकडून समाजानेही प्रेरणा घ्यावी, असे आवाहन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले.
'पुढारी'च्यावतीने "पुढारी कल्याण-डोंबिवली आयकॉन" या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सन्मान राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, भिवंडी - निजामपूर महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य, पुढारीच्या ठाणे-पालघर -रायगड आवृत्तीचे निवासी संपादक शशीकांत सावंत, मार्केटिंग हेड अमित तळेकर उपस्थितीत होते.
मंत्री नाईक पुढे म्हणाले, वर्तमानपत्रांना मसालेदार बातम्या लागतात. मसालेदार बातम्या नसल्या तर वाचकही वर्तमानपत्र वाचत नाहीत. परंतु या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने विचार केला तर पुढारीच्या स्थापनेला 86 वर्षे झाली आहेत. ब्रिटिशांच्या काळात कोल्हापूरात सुरू झालेल्या पुढारीने पश्चिम महाराष्ट्र व्यापला आणि कोकण आणि गोव्या पुढारी आपली कामगिरी बजावत आहे. वर्तमानपत्र जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते. त्यामुळे पुढारी व्यवस्थापनाने वर्धापनदिनाचे औचित्य साधून सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला, ही कौतुकाची बाब असल्याच्या भावना मंत्री नाईक यांनी व्यक्त केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होवून पद्मश्री ग गो. जाधव यांनी पुढारीची मुहूर्तमेढ केली. त्यामुळे आजच्या गतिमान काळात पद्मश्री ग. गो. जाधव यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान केले, काहींजणाना फाशीही झाली. त्यांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या स्वराज्याचा उपभोग आपण घेत आहोत. पुढारी वर्तमानपत्राने बदलत्या काळानुसार वर्तमानपत्र, डिजीटल, एफ. एम. रेडिओ आणि वृत्तवाहिनी असा प्रवास केला आहे, या सर्व माध्यमातून पुढारीने चांगल्या विचारांचे रोपटे लावले, हे रोपटे आता रसाळ फळ देते आहे, याचे पुढारी समूह हे आदर्श उदाहरण असल्याचे नाईक म्हणाले.
पुढारीच्या ठाणे - पालघर -रायगड आवृत्तीचे निवासी संपादक शशीकांत सावंत यांनी प्रास्तविक केले. रिपोर्टर श्रध्दा कांदळकर यांनी परिचय करून दिला. दैनिक पुढारीच्या इव्हेंट प्रमुख वाल्मिका जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले. यानिमित्ताने पुढारीच्या वाचकांसाठी सई परांजपे लिखित आणि दिग्दर्शित इवलेसे रोप नाटकाचा प्रयोग विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवलीकरांनी प्रचंड गर्दी केली होती.