माजी आमदार प्रकाश गजभियेPudhari Photo
Published on
:
31 Jan 2025, 5:55 pm
Updated on
:
31 Jan 2025, 5:55 pm
नागपूर- पक्षीय राजकारण, कुठलेही आंदोलन म्हटले की आरोप-प्रत्यारोप होतच असतात. निवडणूक आली की दिसणारे हे चित्र नंतर मात्र बदलावे अशीच सर्वांची अपेक्षा असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या एका माजी आमदार मित्राला श्रीनगरवरून दिल्ली आणि थेट मुंबईत एअरलिफ्ट करून राज्यात बदल्याचे नव्हे तर आपण बदलाचे राजकारण करीत असल्याचे दाखवून दिले आहे. शरद पवार गटाचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्याशी असलेली जुनी मैत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने जपली आहे. 20 लाख रुपयांच्या शासकीय खर्चाने मुंबई येथे आणून गजभिये यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहेत.
नुकतेच प्रकाश गजभिये कुटुंबासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. बर्फावरून पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली. तातडीने जम्मू येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. ते कोमात गेल्याने त्यांना तातडीने दिल्लीला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र,शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बाब कळताच त्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांसोबत संपर्क साधला. प्रकाश गजभिये यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मैत्री जपल्याने त्यांचे आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश गजभिये हे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील मैत्र जपणारे आहेत. महापालिकेच्या राजकारणापासून त्यांची मैत्री आहे. फडणवीस महापौर असताना गजभिये रिपाईचे नगरसेवक व पुढे विरोधीपक्षनेतेसुद्धा होते. केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे महायुतीत सहभागी झाले. प्रकाश गजभिये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायम राहिले. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेत पाठविले.