प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
:
31 Jan 2025, 4:40 pm
Updated on
:
31 Jan 2025, 4:40 pm
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
दिग्रस तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापकाने सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना २६ जानेवारी रोजी घडली. बुधवारी २९ जानेवारीला संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. विशाल विजयकुमार कुलकर्णी ( वय ४३) असे ताब्यात घेतलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
दिग्रस तालुक्यातील एका गावात पीडित मुलीची आई घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मुलीचे वडील बाहेर राज्यात खासगी नोकरीला आहे. सहा वर्षीय पीडित मुलगी कोणत्याच शाळेत प्रवेशित न झाल्याने ती तालुक्यातील एका शाळेत जाऊन बसत होती. २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी ती शाळेत गेली. कार्यक्रम झाल्यावर मुख्याध्यापक विशाल कुलकर्णी याने त्या मुलीकडे वाईट नजरेने बघितले. यापूर्वी देखील त्याने लैंगिक छळ केला होता. दुसऱ्या दिवशी २७ जानेवारीला पीडित मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला. तरीसुध्दा मुलीच्या कुटूंबीयांनी तिला शाळेत पाठवले. शाळा सुटल्यावर दुपारी शाळेतून घरी आणल्यानंतर पीडित मुलीने मुख्याध्यापकाच्या छेडछाड व अत्याचाराची आपबीती कथन केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कुटूंबीयांनी थेट पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत मुख्याध्यापक विशाल कुलकर्णीरूध्द दिग्रस पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे व पोलिस सहकारी करत आहेत.
दोन दिवसांची कोठडी; तडकाफडकी निलंबन
पोलीसांनी गुन्हे दाखल करून मुख्याध्यापकाला शाळेतून अटक केली व न्यायालयात हजर केले. आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रशासन अधिकारी यांनी मुख्याध्यापकाचे निलंबन केले.