Published on
:
24 Nov 2024, 1:39 pm
Updated on
:
24 Nov 2024, 1:39 pm
नागपूर : आधी पक्ष फोडले मग घर फोडले, पण केवळ १० आमदार निवडून आले, शरद पवार यांचे राजकारण संपले असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. आज नागपुरातून मुंबईकडे जाताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित दादांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उभे केले यासंदर्भात ते बोलत होते.
पावसात भिजण्याचे त्यांनी नाटक केले. पण कुठलेही नाटक फार काळ चालत नाही असेही म्हणाले. माझा विजय होणारच होता ते मी आधीच सांगितलं होते. माझी मुलगी भाग्यश्री शरद पवार गटाची उमेदवार असली तरी ती चौथ्या नंबरवर येईल असही मी सांगितलं होतं पण तिसऱ्यावर आली. मी आधीच सांगितलं होतं २०० च्या वर आमच्या महायुतीच्या जागा येतील आणि तसंच झालं आमचं उद्या परवा सरकार बसेल असा दावा आत्राम यांनी केला. ज्यांचे अधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री होईल. लढाई झाली, आम्हाला ४१ जागा मिळाल्या. आम्ही अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या.
तुम्ही सगळ्या पत्रकारांनी आमच्या १८ जागा सांगितल्या होत्या पण आमच्या ४१ झाल्या स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे. लाडका भाऊ, लाडकी बहीण या सगळ्या योजनांचा चांगला फायदा झाला. लोकांनी आम्हाला निवडून दिलं आता विरोधक पाच वर्ष घरी बसतील. त्यांचे काम ते करतील. आमचे काम आम्ही करू, सगळे मोठे मोठे नेते पडले. आता ते कुठेतरी थांबले पाहिजे. उलट आमचे नेते पडतील असं ते बोलत होते मात्र ते निवडून आले.