Published on
:
24 Nov 2024, 2:29 pm
Updated on
:
24 Nov 2024, 2:29 pm
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघांपैकी ९ जागांवर भाजप महायुतीला यश आले. तर तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळविला. चार मतदारसंघांमध्ये कॉंग्रेस, अपक्ष उमेदवारांचा पराभव झाला खरा मात्र, विजयी उमेदवारांच्या तुलनेत पोस्टल मतदानामध्ये अधिक मतांमुळे ते लोकांच्या पसंतीत जिंकले.
निवडणूक कामासाठी सेवा घेण्यात येणा-या अधिकारी व कर्मचा-यांनाही पोस्टल मतदानाची सोय उपलब्ध असते. याशिवाय ४० टक्क्यांवर दिव्यांग व्यक्ती आणि ८५ वर्षांवरील वृद्धांनाही पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.काटोल विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार चरणसिंग ठाकूर विजयी झाले तर राष्ट्रवादी (श.प.) गटाचे सलील अनिल देशमुख यांचा पराभव झाला. मात्र, पोस्टल मतांमध्ये देशमुख यांना ९९० तर ठाकुर यांना ८५९ इतकी मते मिळाली आहेत. सावनेरमध्येही कॉंग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांचा पराभव झाला असून तिथे भाजप उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांचा विजय झाला. मात्र, पोस्टल मतांमध्ये अनुजा केदार यांना ९४० तर डॉ. देशमुख यांना ८१९ इतकी मते मिळाली.
त्याचप्रमाणे रामटेक विधानसभेमध्ये शिवसेनेचे अॅड. आशिष जयस्वाल हे विजयी झाले असून येथे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांचा पराभव झाला. परंतु पोस्टल मतांमध्ये मुळक यांना जयस्वालच्या तुलनेत अधिक मते मिळाली आहेत. जयस्वाल यांना ५५३ तर मुळक यांना ७१२ मते प्राप्त झाली. तसेच दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांचा भाजपचे मोहन मते यांनी १५ हजारांहून अधिकच्या मताधिक्क्याने पराभव केला असला तरी पोस्टल मतांमध्ये पांडव यांना मतेंपेक्षा अधिक म्हणजे १६७४ तर मोहन मते यांना १६३४ इतकी मते मिळाली आहेत. एकूणच सामान्य जनतेच्या मतदानामध्ये जरी या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी पोस्टल मतांमध्ये त्यांनी एकप्रकारे विजयी उमेदवारांच्या तुलनेत अधिकची मते घेतली आहेत. २४,८९६ व्यक्तींनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला. दक्षिण नागपूर मतदारसंघात ३४८२ तर सर्वात कमी १४४४ रामटेक विधानसभेत झाले.