देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या ५ डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत.(Image source- @BJP4Maharashtra)
Published on
:
04 Dec 2024, 8:27 am
Updated on
:
04 Dec 2024, 8:27 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज (दि.४) सर्वानुमते निवड झाली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून उद्या ५ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. फडणवीस १९९९ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००४ मधील निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. त्यापाठोपाठ २००९, २०१४, २०१९ आणि आता २०२४ असे सहावेळा विधानसभेवर निवडून आलेत. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा फडणवीस यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
ते २०१४ ते २०१९ दरम्यान सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री ठरले. २०१९ मधील निवडणुकीला भाजप- शिवसेना युतीला जनादेश मिळाला होता. पण मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेची काँग्रेस आघाडीसोबत चर्चा झाली. दरम्यान, फडणवीस यांनी २३ नोव्हेंबरच्या सकाळी अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची खेळी केली. मात्र, हे सरकार अवघ्या तीन दिवसांत कोसळले. आता फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे त्यांचे बहुमताचे सरकार सत्तेवर आले आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द
जन्म : २२ जुलै, १९७०
शैक्षणिक पात्रता : नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी १९९२. पुढे बर्लिन येथे व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापन पद्धती आणि तंत्र पदविका शिक्षण घेतले.
१९९२ ते ९७ : नगरसेवक, नागपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक.
१९९७ ते २००१ : नगरसेवक पदाचा दुसरा कार्यकाळ.
१९९७ ते २००१ : महापौर, नागपूर शहर.
१९९९ : पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
२००४ : दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी. त्यापाठोपाठ २००९, २०१४, २०१९ आणि आता २०२४ असे सहावेळा विधानसभेवर निवडून आले.
२०१४ ते २०१९ : राज्याचे मुख्यमंत्री. दीर्घकाळातनंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री ठरले.
२०१९ : युतीला जनादेश असताना मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने काँग्रेस आघाडीसोबत चर्चा केली. यादरम्यान २३ नोव्हेंबरचा सकाळी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याची खेळी केली. मात्र, हे सरकार अवघ्या तीन दिवसांत कोसळले.
२०१९ ते २२ : विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून अडीच वर्षांचा कार्यकाळ.
२०२२ ते २४ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात शिंदेशाही. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री.
१९८९ : नागपुरात वॉर्ड संयोजक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरूवात.
१९९० : नागपूर पश्चिम विधानसभा क्षेत्रात कार्यकारिणी सदस्य.
१९९२ : भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर शहर उपाध्यक्ष.
१९९४ : भारतीय जनता युवा मोर्चा, प्रदेश उपाध्यक्ष.
२००१ : भारतीय जनता युवा मोर्चा, राष्ट्रीय उपाध्यक्ष.
२०१० : सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस.
२०१३ : भाजप प्रदेशाध्यक्ष. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र पिंजून काढला.
२०२० : बिहार राज्यासाठी भाजप निवडणूक प्रभारी.
२०२२ : गोवा राज्यासाठी भाजप निवडणूक प्रभारी.
विधिमंडळातील अभ्यासू सदस्य
अंदाज समितीसह नियम, सार्वजनिक उपक्रम, नगरविकास आणि गृहनिर्माण स्थायी समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, स्वयंनिधी शाळा संयुक्त समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त निवड अशा विविध समित्यांवर सदस्य म्हणून कामकाज.
भारतातील कृषी क्षेत्रात परिवर्तनासाठी नीती आयोगाच्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष.
सचिव, आशिया प्रदेशासाठी निवासस्थानावरील जागतिक संसद सदस्य मंच.
उपाध्यक्ष, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक (भोसला मिलिटरी स्कूल).
अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन.
सिनेट सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.
१९९९ : आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद, अमेरिका.
२००५ : राज्य विधिमंडळाची अमेरिकेतील राष्ट्रीय परिषद.
२००६ : स्वित्झर्लंडमधील दावोस येथील आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत भारतातील आपत्ती निवारण आणि व्यवस्थापनावर सादरीकरण.
२००६ : चीनची राजधानी बीजिंग येथील परिषदेत नैसर्गिक आपत्ती निवारणावर प्रबंध सादरीकरण.
२००७ : कोपनहेगन, डेन्मार्क येथे आशिया आणि युरोपमधील तरुण राजकीय नेत्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले.
अर्थसंकल्प सोप्या भाषेत. (अर्थसंकल्प कसे वाचावे आणि समजून घ्यावे यावरील पुस्तक)
आत्मनिर्भर महाराष्ट्र- आत्मनिर्भर भारत हे पुस्तक