दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या आयुष्यावर आणि प्रेमकहाणीवर आधारित एक डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजपासून स्ट्रीम होत आहे. या डॉक्युमेंट्रीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अभिनेता आणि निर्माता धनुषने नयनताराला या डॉक्युमेंट्रीविरोधात 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावली होती. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नानुम रावडी धान’ या चित्रपटातील काही गाणी आणि व्हिडीओ आपल्या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरण्यास परवानगी द्यावी, यासाठी नयनतारा धनुषला विनंती करत होती. मात्र दोन वर्षांपर्यंत धनुषने त्यावर कोणतंच उत्तर दिलं नव्हतं. अखेर तिने खासगी मोबाइलमध्ये शूट केलेला सेटवरील तीन सेकंदांचा व्हिडीओ आपल्या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरला. त्यावरूनच धनुषने तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतर नयनताराच्या संयमाचा बांध सुटला आणि तिने सोशल मीडियावर खुलं पत्र लिहित धनुषला चांगलंच सुनावलं. आता नयनताराच्या या पत्रानंतर धनुषने त्याच्या वकिलांमार्फत तिला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
“‘तुमच्या क्लायंटने ‘नयनतारा बियाँड द फेरीटेल’ नावाच्या माहितीपटात माझ्या क्लायंटच्या ‘नानुम रावडी धान’ या चित्रपटातील कंटेट वापरून कॉपीराइट्सचं उल्लंघन केलंय. तो कंटेट 24 तासांच्या आत काढून टाकण्याचा सल्ला त्यांना द्या. अन्यथा माझा क्लायंट त्याविरोधात कायदेशीर कारवाई करेल. त्यात केवळ तुमच्या क्यायंडकडून आणि नेटफ्लिक्स इंडियाकडून 10 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, याचाच समावेश नसेल,” असा इशारा धनुषच्या वकिलांकडून देण्यात आला आहे. नयनताराने तिच्या मोबाइल फोनमधील फुटेज वापरल्याचं खुल्या पत्रात म्हटलं होतं. त्यावरही धनुषच्या वकिलांनी उत्तर दिलं आहे. “माझा क्लायंट हा चित्रपटाचा निर्माता आहे आणि चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी प्रत्येक पैसा कुठे खर्च केला आहे याची त्यांनी सविस्तर माहिती आहे. तुमच्या क्लायंटने असं म्हटलंय की माझ्या क्लायंटने पडद्यामागील फुटेज शूट करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला नियुक्त केलं नाही आणि ते विधान निराधार आहे. तुमच्या क्लायंटने त्याचा कडक पुरावा दिला आहे”, असं त्यांनी म्हटलंय.
हे सुद्धा वाचा
नेमकं काय आहे प्रकरण?
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या नयनताराच्या माहितीपटात तिची आणि तिचा पती-दिग्दर्शक विग्नेश शिवनची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. ‘नानुम रावडी धान’ या चित्रपटाच्या सेटवरच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या चित्रपटाचा निर्माता धनुष होता, तर दिग्दर्शनाचं काम विग्नेशने केलं होतं. नयनतारा यामध्ये मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटादरम्यान धनुष आणि नयनतारा, विग्नेश यांच्यात काही वाद झाले होते. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना नयनताराने धनुषला टोमणा मारला होता. “मला धनुषची माफी मागायची आहे, कारण त्याला या चित्रपटातील माझं काम अजिबात आवडलं नाही. धनुष, मला माफ कर, मी तुझी निराशा केली. पुढच्या वेळी मी कदाचित चांगलं काम करेन”, असं ती पुरस्कार सोहळ्यात जाहीरपणे म्हणाली होती. तेव्हापासून धनुष आणि तिच्यात वाद असल्याचं म्हटलं जातं.