महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी मतदान संपल्यावर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे बडे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच नवीन सरकार आल्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषण करण्याची वेळ येणार नाही. नवीन सरकार ती परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे नवीन सरकार समोर मराठा आरक्षणाचा विषय प्राधान्यक्रमाने असणार असल्याचे संकेत मिळत आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
भाजप नेते चंद्रकांत पाटील सहपरिवार शुक्रवारी साई दरबारी आली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, सत्ता स्थापनेसाठी आम्हाला जागा कमी पडणार नाही. कमळ, धनुष्यमान आणि घड्याळ यांच्या 160 जागा निवडून येतील. त्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय दिल्लीत तिन्ही पक्षांच्या बैठकीत होईल. आमची संघटना शिस्तीत चालते आहे, कशातच फूट पडली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा दिल्लीतील नेत्यांवर विश्वास आहे.
जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ
एकदा ईव्हीएम मशीनमध्ये मत बंद झाली की अंदाज व्यक्त करून काही बदल होणार नाही. अपवाद सोडला तर सर्व सर्व्हे महायुतीचे सरकार येईल, असेच चित्र दाखवत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या जागा 160 च्या खाली येणार नाही. तसेच जे जे आमच्या सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ. परंतु सरकार बनवण्यासाठी कुणाला बरोबर घ्यावे लागणारच नाही.
हे सुद्धा वाचा
विरोधकांना घटनाच मान्य नाही…
चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली घटना मानतो. त्या घटनेच्या चौकटीत जे आहे ते आम्हाला मान्य आहे. घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्हाला कधी न्याय मिळाला नाही आणि मिळू शकत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेत ज्या संस्था म्हणजेच ईडी , हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग आहे. परंतु या संस्था विरोधकांना मान्य नाही. एका बाजूने संविधान बचावचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे संविधानातील कुठलीच परंपरा मानायची नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली.