नागपूर उच्च न्यायालयाचा निर्णय:अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने लैंगिक संबंध ठेवणे हाही बलात्कारच, व्यक्तीची शिक्षाही ठेवली कायम

6 days ago 2
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर सुनावणी करताना, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पत्नीसोबत संमतीसह शारीरिक संबंध ठेवणे हा बलात्कार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय या गुन्ह्यात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेल्या व्यक्तीची शिक्षाही न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशात, सत्र न्यायालयाच्या २०२१ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या २४ वर्षीय व्यक्तीची याचिका फेटाळून लावली. सत्र न्यायालयाने आरोपीला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार, त्याच्या अल्पवयीन पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, पीडिता त्याची पत्नी असल्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही. मात्र उच्च न्यायालयाने पत्नीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर तिच्याशी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याच्या आधारावर बचाव होऊ शकत नाही असे सांगितले. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे हा बलात्कार आहे, मग ती विवाहित असो वा नसो, असे खंडपीठाने म्हटले आहे. २०१९ मध्ये महिलेने तक्रार दाखल केलेल्या तक्रारीत तिने ती आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु तिने नकार देवूनही त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला गर्भवती केले असे नमुद केले आहे. यानंतर दोघेही एकत्र राहू लागले आणि लग्न केले. मात्र पतीने गर्भपात करण्याचा हट्ट धरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लग्नाच्या नावाखाली तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. न्यायालयाने सांगितले की, महिलेने मुलाला जन्म दिला असून डीएनए चाचणीनुसार आरोपी आणि महिला हे जैविक पालक आहेत. तर पतीने आपल्या याचिकेत दोषी नसल्याची कबुली दिली आणि तक्रारदार ही त्याची पत्नी आहे, त्यामुळे त्यांच्यातील शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही आणि हे संबंध सहमतीने होते. कथित घटनेच्या वेळी ही महिला अल्पवयीन नव्हती, असा दावाही त्याने केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करण्यास नकार दिला. कागदोपत्री पुराव्यानुसार, तक्रारदाराचा जन्म २००२ मध्ये झाला होता आणि २०१९ मध्ये कथित घटना घडली तेव्हा ती अल्पवयीन होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article