Published on
:
21 Jan 2025, 4:17 am
Updated on
:
21 Jan 2025, 4:17 am
नाशिक : गंधर्वनगरी परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या डक्टमध्ये ८ वर्षीय दिव्यांग मुलाचा मृतदेह रविवारी (दि. १९) आढळला. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, या मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत तसेच खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगर येथील गंधर्वनगरी परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रविवारी या इमारतीच्या डक्टमध्ये परिसरातील एका ८ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. सोमवारी (दि. २०) मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालात मुलाच्या बरगड्या तुटल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याच्या अज्ञानतेचा आणि असहायतेचा गैरफायदा घेत अज्ञाताकडून वारंवार अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकारही उघड झाला आहे. या प्रकरणाचा उपनगर पोलिस तपास करीत आहेत.
मूकबधिर असलेल्या या मुलावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीदेखील या मुलाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवालात या मुलाच्या बरगड्या तुटल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच तो ज्या डक्टमध्ये पडलेला आढळून आला, तेथे उंचावरून पडल्याने या मुलाचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. इमारतीच्या गच्चीवर पतंग, मांजा आढळून आला आहे. त्यामुळे पतंग उडवताना हा मुलगा खाली पडला की त्यास अज्ञात मारेकऱ्याने उंचावरून पाडले, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मुलाच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.
शवविच्छेदन अहवालातून अनैसर्गिक अत्याचाराची घटना उघड झाली आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या प्राथमिक स्तरावर असून, आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत. मृत मुलगा दिव्यांग असल्याबाबत त्याच्या शालेय कागदपत्रांच्या आधारे तपासणी केली जात आहे. =
-मोनिका राऊत, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ दोन