पहाटेच्या शपथविधीचे षडयंत्र कुणी रचले?:धनंजय मुंडे यांच्या विधानावर छगन भुजबळ यांचा सवाल; 2019 चा सांगितला किस्सा
3 hours ago
1
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना 2019 चा पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होते असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यासंबंधी बोलताना पहाटेचा शपथविधी षडयंत्र होते, तर ते कुणी रचले होते? असा सवाल उपस्थित केला आहे. अजित पवारांनी 2019 मध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अल्पावधीचे सरकार स्थापन केले होते. त्यात फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भल्या पहाटेच्या वेळी हा शपथविधी झाला होता. या शपथविधीमु्ळे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना खिळ बसण्याची भिती निर्माण झाली होती. धनंजय मुंडे यांनी या घटनाक्रमावर भाष्य करताना आपण अजित पवारांना पहाटेचा शपथविधी घेण्यास मनाई केल्याचा दावा केला होता. पहाटेच्या शपथविधीवेळी मनी अजित पवारांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका. हे षडयंत्र आहे, असे ते म्हणाले होते. ..मग ते षडयंत्र कुणी रचले होते? छगन भुजबळ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्या या विधानावर भाष्य केले. तसेच या शपथविधीपूर्वी व नंतर घडलेल्या संपूर्ण किस्सा सांगितला. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांचे अधिवेशनात भाषण झाले त्यावेळी मी तिथे नव्हतो. पण नंतर मी त्यांचे भाषण ऐकले. मुंडे म्हणाले, ते षडयंत्र होते. मग ते षडयंत्र कुणी रचले होते? एकतर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेसही असे षडयंत्र रचू शकत नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी हे षडयंत्र रचले की भाजपच्या नेत्यांनी रचले? याची काहीच माहिती नाही. मला एवढे आठवते की, त्यावेळी बैठकांवर बैठका सुरू होत्या. काँग्रेस, शिवसेना (संयुक्त) व शरद पवार यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. त्यावेळी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे व शरद पवार यांच्यात एका बैठकीत वाद झाला. त्यानंतर शरद पवार रागाने निघून गेले. त्यानंतर काही प्रमुख मंडळींच्या मिटिंग झाल्या. आमच्या राष्ट्रवादीची रात्री 8 वा. एका ठिकाणी बैठक बोलावण्यात आली. पण त्या बैठकीला अजित पवार हजर नव्हते. ते कुठेतरी अडकले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही 8-9 वाजता टीव्ही लावला तर अजित पवारांचा शपथविधी झाल्याचे आम्हाला दिसले. मी शरद पवार यांच्याकडे गेलो. तोपर्यंत त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यांनी त्यांना सांगितले होते की, आपण मजबुतीने उभे राहून हा जो काही प्रयत्न झाला आहे तो होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही सर्वजण तेव्हा विचारात होतो. असे काही होईल याची कोणतीच कल्पना आम्हाला नव्हती. सर्वकाही अचानक ते झाले होते. त्यानंतर आम्ही तिकडे गेलेल्या आमदारांना पुन्हा गोळा करण्यास सुरूवात केली. हे मला माहिती आहे. मी अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मांडला पुढे मी स्वतः अजित पवार यांच्या घरी गेलो. त्यांना म्हणालो, तुम्ही असे काही करू नका. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल आला. त्या निकालानंतरही आम्ही त्यांना सांगितले की, आता तुमची वाटचाल पुरती कठीण झाली आहे. तुम्ही हे सर्व सोडा व पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्या बैठकीला सर्व आमदार हजर होते. त्यात मी ठराव मांडला. अजित पवार चुकले असतील ठीक आहे. पण त्यांना परत आपल्या पक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर अजित पवारांना बैठकीत बोलावण्यात आले. त्यानंतर सर्वांनीच त्यांचे स्वागत केले. एवढेच नाही तर मीच त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची सूचना केली होती. माझ्या या सूचनेचा काही जणांना राग आला. अजित पवार नव्हे तर आपण उपमुख्यमंत्री व्हावे असे त्यांना वाटत होते. त्यांना माझाही राग आला होता. पण त्यावेळी मला ते योग्य वाटले म्हणून मी ते केले. आता परवा धनंजय मुंडे यांनी जे काही सांगितले, त्याचा रोख कुणाकडे होता याची मला कल्पना नाही. ते त्यांनाच विचारले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले. पालकमंत्रिपदाच्या वादावर तोडगा निघेल छगन भुजबळ यांनी यावेळी नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वासही व्यक्त केला. ते म्हणाले, या प्रकरणी काहीतरी अडचणी निर्माण झाल्या असतील. त्यामु्ळे नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली असेल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. ते तेथून परत आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्याशी चर्चा करतील. या मुद्यावर ते नक्कीच मार्ग काढतील.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)