आळंदी नगरपरिषदेच्या मरकळ चौकात असलेल्या स्वच्छतागृहात मुख्य दरवाजासमोरच गेल्या अनेक वर्षांपासून उघड्या अवस्थेत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले असून, तेथे तो उपचार घेत आहे.
रात्रीच्या वेळी स्वच्छतागृहाचा वापर करण्याकरता हा तरुण स्वच्छतागृहात गेला होता. मात्र, त्या ठिकाणी अंधार असल्याने तेथील उघडी टाकी त्याच्या नजरेत आली नाही. स्वच्छतागृहातून बाहेर पडताना नजरचुकीने तो त्या टाकीत पडला व जखमी झाला. संबंधित तरुण या घटनेत जखमी झाला. मात्र, हीच दुर्घटना जर लहान शालेय मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्याबाबतीत घडली असती व त्या वेळी तेथे कोणाची मदत मिळाली नसती, तर कदाचित ते एखाद्याच्या जिवावर बेतण्यासारखे देखील आहे. यामुळे पालिकेने या घटनेतून धडा घेऊन तातडीने अशा धोकादायक गोष्टी दुरुस्त कराव्यात, अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत. आळंदीत नगरपालिकेतर्फे चौदा ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.
मात्र, नगरपालिकेतर्फे या स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक स्वच्छतागृहांमध्ये अंधार असून, विद्युत दिवे चोरीला गेलेले आहेत. पाण्याची व्यवस्था देखील काही ठिकाणी उपलब्ध नसून नळाच्या तोटी चोरीला गेल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांनी केली आहे.