Published on
:
21 Nov 2024, 1:49 pm
Updated on
:
21 Nov 2024, 1:49 pm
केज : केज विधानसभेच्या निवडणुकीचे कामकाज आटोपून सर्व साहित्य निवडणूक विभागात जमा करून परत गावाकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या पाटोदा तालुक्यातील शिक्षकाला अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्यावर केज येथे उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे घेवून जात असताना रस्त्यातच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.मुकुंद गुलाबराव भालेराव असे या शिक्षकाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील जानपीर विद्यालयात शिक्षक असलेले मुकुंद गुलाबराव भालेराव वय (५६ वर्ष) हे निवडणुकीच्या कामासाठी केज येथे आले होते. अंबाजोगाई शहरातील बूथ क्र. १२९ येथे त्यांनी क्र. दोनचे निवडणुक अधिकारी म्हणून काम केले. निवडणुकीचे काम आटोपून त्यांनी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास केज तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात मतदान यंत्र व मतपेट्या आणि निवडणुकीचे साहित्य जमा केले. त्या नंतर ते जेवणासाठी बाहेर गेले होते. त्या वेळी त्यांना अचानक डोके जड होऊन रक्तदाब वाढला. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी रुग्णवाहिकेतून घेवून जात त्यांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे भरती केले.
तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केल्याने त्यांना बरे वाटू लागले. त्या नंतर पहाटे ३:३० ते ४:०० वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला दिला. त्यांना सरकारी रुग्णवाहिके मधून अंबजोगाकदे जात असताना रस्त्यातच हृदय विकाराच्या तीव्र झटका आला. त्याच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुकुंद गुलाबराव भालेराव यांचा मृत्यू हा निवडणुकीच्या कामा दरम्यान मृत्यू झाला असल्याने त्यांच्या कुटुंबाला निवडणूक विभागाच्यावतीने १५ लक्ष रू. ची आर्थिक मदत देण्या संदर्भात प्रस्ताव पाठवून त्यांना मदत केली जाईल.
दीपक वजाळे, निवडणूक निर्णय अधिकारी, केज (,अ.जा.) विधानसभा मतदारसंघ