निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीच केले नाही मतदान:कन्नड सोयगाव विधानसभा येथील अधिकारी संतोष गोरड यांनीच मतदानाकडे फिरवली पाठ!

3 hours ago 1
कन्नड सोयगाव विधानसभेची निवडणूक धुरा सांभाळणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनीच मतदानाकडे पाठ फिरवली. श्री गोरड यांची आता कोठे ओरड करावी, असा स्विप पथकालाच नव्हे तर मतदारांना पडला आहे. साडेतीन लाख मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करा असे जन प्रबोधन करणाऱ्या स्विप पथकात याची चर्चा सुरू आहे. विधानसभेसाठी दि.20 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी सहा वाजून गेले तरी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड यांच्या बोटाला मतदान केल्याची शाई लागलेली नव्हती. स्विप पथकाने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाभरात मतदान करावे याबाबत बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, गावागावात जाऊन रॅली काढून एवढेच नव्हे तर चक्क उसाच्या फडात जाऊन देखील मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र एवढे असूनही स्वतः एस डी एम उपविभागीय अधिकारी मतदानापासून वंचित राहिले कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे जे कर्मचारी आजारी होते, ज्यांना कॅन्सर सारखे दुर्धर आजार होते, एकच किडनी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा दाखवत कर्तव्यास भाग पाडले. मात्र स्वतः मतदानाचा हक्क बजावला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संदर्भात टपाली मतदान प्रमुख निलेश राठोड यांनी सांगितले की, निवडणूक निर्णय अधिकारी गोरड यांनी मतदान केल्याचे आठवत नाही. तालूक्यात दोन हजार पन्नास टपाली मतदान झाले हे मात्र त्यांना आठवते. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड यांनी सांगितले की, मतदान कार्यात गुंतलेलो असल्याने मी टपाली मतदान करण्याचे विसरून गेलो. माझे मतदान लातुर येथे होते. पण मतदान करण्याचे माझ्या लक्षातच राहीले नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article