Published on
:
17 Nov 2024, 6:46 am
Updated on
:
17 Nov 2024, 6:46 am
परभणी, पुढारी वृत्तसेवा : सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. लहान मुलांत वाढत्या थंडी वातावरणातील बदलाने सर्दी, खोकला मोठ्या प्रमाणात आढळतो. पण नागरिकांकडून तो किरकोळ म्हणून दुर्लक्ष होते किंवा घरगुती उपचार केले जातात. यामुळे बालकांत न्यूमोनिया बळावतो व बालमृत्यू होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे न्यूमोनियापासून आपल्या बाळाचे संरक्षण करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी केले आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि.१२ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत जागतिक न्युमोनिया दिन राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने त्या लहान बालकांच्या पालकांना दक्षता घेण्याबाबत बोलत होत्या. हिवाळ्यात मुले अनेकदा आज तरी पडतात. बदलत्या ऋतूत मुलांना सर्दी, ताप, न्यूमोनियाचा धोका वाढतो व हा संसर्गजन्य रोग असून घरगुती उपायांनी त्यावर उपचार करता येत नाही. पण संसर्ग टाळण्यासाठी घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या मुलांना न्यूमोनिया व अन्य आजारांपासून सुरक्षित ठेवू शकता.
न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग असून त्यामुळे वायुमार्गात अडथळा येतो. संसर्गातील व्यक्तीस खोकला, कफ व तापाचा त्रास होतो व या समस्या कमकुवत प्रतिकारशक्तीतील लोकांना जास्त उदभवतात. जेंव्हा हवामान बदलते तेव्हा मुलांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. खरे तर थंडीच्या दिवसांत दुर्लक्ष केल्याने मुले न्यूमोनिया व अन्य संसर्गजन्य आजारांना बळी पडतात. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते म्हणाले की, न्युमोनिया हा बॅक्टेरिया किंवा बुरशीमुळे होतो. न्युमोनिया हा तीव्र श्वसनाचा संसर्गजन्य आजार आहे.
फुप्फसात असणाऱ्या वायु पिशव्यांत हवा भरण्याऐवजी पू आणि द्रवाने ज्यावेळी ती भरली जातात त्या प्रक्रियेत श्वसन घेण्यास बाळास अडथळा निर्माण होतो या स्थितीला न्यूमोनिया म्हणतात असे कळविले आहे.
न्यूमोनियावर करावयाच्या ठोस उपाययोजना
बाळाला न्यूमोनिया होण्याचा धोका हिवाळयात संभवतो. लसीकरण, पुरेसे पोषण व पर्यावरण विषयक घटकांचा वापर आवश्यक आहे. यात बाळाला ऊबदार ठेवणे, वारंवार आंघोळ न घालणे, धूप- अंगारे-लेप न लावणे. बाळाला सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घेऊनच औषधोपचार करण्यात यावेत असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.