Published on
:
17 Nov 2024, 7:55 am
Updated on
:
17 Nov 2024, 7:55 am
डोणजेचे माजी उपसरपंच, सरकारी ठेकेदार आणि उद्योजक विठ्ठलराव सखाराम पोळेकर (वय ६५) यांचे खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आला. हा प्रकार शनिवारी (दि. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी काही आरोपींना हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. विठ्ठलराव पोळेकर हे डोणजे येथील घरातून गुरुवारी (दि. १४) रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे मार्निंग वॉकिंगसाठी सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला गेले होते. मात्र, ते परत घरी आले नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते कोठेही सापडले नाहीत. काही दिवसांपूर्वी विठ्ठलराव पोळेकर यांना काही सराईत गुन्हेगारांनी खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यामुळे त्यांचे अपहरण केले असावे, अशी शक्यता लक्षात घेऊन नातेवाइकांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
तेव्हापासून हवेली पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची पथके पोळेकर यांचा शोध घेत होती. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पोळेकर यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सोनापूर व ओसाडे गावच्या हद्दीवरील खडकवासला धरणात सापडला. हवेली पोलिसांनी नांदेडसिटी पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने रेस्कू करून सायंकाळी उशिरा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आला. पुणे जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, हवेली विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार फुलारी, हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी हवेली पोलिस तपास करत आहेत.