Published on
:
17 Nov 2024, 8:21 am
Updated on
:
17 Nov 2024, 8:21 am
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी रविवारी (दि.१७) विदर्भ दौऱ्यावर आहेत. हेलिकॉप्टरने वडसा देसाईगंज येथे जाहीर सभा आटोपल्यानंतर त्यांचे दुपारी २ नंतर दोन तास नागपुरात दोन रोड शो आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे मध्य नागपुरातील रोड शोचा समारोप संघ मुख्यालयाजवळ बडकस चौक येथे होत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रियंका गांधी काय बोलतात संघ, भाजपवर कुठला हल्लाबोल करतात याविषयीची उत्सुकता आहे. अलीकडेच रेशीम बाग स्मृती मंदिर परिसरात असलेल्या सुरेश भट सभागृहात राहुल गांधी संविधान सन्मान संमेलनासाठी आले होते. संघ भूमी विरुद्ध दीक्षाभूमी नेहमीच वैचारिक लढाई राहिली आहे.
काँग्रेसने गांधीगेट महाल ते बडकस चौक हा परिसर तिरंगी फुगे, झेंडे, होर्डिंग लावून सजविला आहे. पश्चिम नागपुरचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ त्या पहिला ‘रोड-शो’ करणार आहेत. अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौक दरम्यान त्या जनतेचे आशीर्वाद मागणार असून स्वागताची तयारी झाली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शेवटच्या टप्प्यात विदर्भात आले. मात्र आज रविवारी अकस्मिकपणे विदर्भातील सर्व सभा रद्द करून ते दिल्लीकडे रवाना झाले.
भाजप कार्यकर्ते यामुळे नाराज झाले असताना प्रियंका गांधी यांच्या दौऱ्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे. काँग्रेसकडून राहुल व प्रियंका गांधी यांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील 12 जागांची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
आजवरच्या निवडणुकीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच राहुल गांधी पश्चिममध्ये प्रचाराच्या निमित्ताने आले आहेत. प्रियंका गांधी प्रथमच येत आहेत. काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी संघ मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्यासोबतच विविध मागण्यांसाठी संघ मुख्यालय परिसरात अनेकदा आंदोलने केली आहेत या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे भाजपने येथून विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांना मैदानात उतरवले आहे. हलबा उमेदवार नाकारल्याने काँग्रेस, भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर मध्य नागपूरची निवडणूक अटीतटीची झाली आहे.
बडकस चौकातील काँग्रेसचे होर्डिंग्स काढल्याने तणाव
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांच्या रोड शोच्या निमित्ताने बडकस चौक परिसरात लावण्यात आलेले काही बॅनर, पोस्टर अज्ञात व्यक्तींनी रविवारी काढलेले आढळल्यानंतर काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तणावाची परिस्थिती असल्याने घटनास्थळी पोलिसांचे मोठा फौज फाटा पोहोचला. भाजपवाले आपले होर्डिंग्स काढू शकतात मात्र दिल से नहीं...! आपल्याला लोकांच्या मनातून काढू शकत नाहीत असा पवित्रा घेत परिसरातील नागरिकांची हस्तांदोलन, पाया पडून आपला अभिनव पद्धतीने प्रचार सुरूच ठेवला. हे बॅनर, होर्डिंग्ज अनधिकृत पद्धतीने लावण्यात आले असल्यामुळे काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.