पतीने चाकुने वार केलेल्या पत्नीचा पुण्यात उपचारादरम्यान झाला मृत्यू:पतीला सोनईतून, सहआरोपींना राहत्या घरातून केले अटक
2 hours ago
2
चारित्र्याच्या संशयावरून पतीने चाकूने गळ्यावर वार तसेच डोक्यात दगडाने घाव घातलेल्या पत्नीचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पतीवर राहुरी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी पतीसह तिघांना अटक केली. तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात २५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. चारित्र्याच्या संशयावरून नारायण बाजीराव चव्हाण याने पत्नी मंदा हिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार तसेच डोक्यात दगड घातला होता. चव्हाण यांच्या मुली सायंकाळी शाळेतून घरी आल्यानंतर आपली आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आल्याने या मुलीनी हंबरडा फोडला होता. पत्नीला गंभीर जखमी करून घरात कोंडून फरार झालेला नारायण चव्हाण यास सोनई येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर या घटनेतील सहआरोपी हरिभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे येथून, तर आरोपी रुख्मिनी बाजीराव चव्हाण हिला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदा चव्हाण यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान मंदाने या जगाचा निरोप घेतला. या घटनेतील मुख्य आरोपी नारायण चव्हाण हा बांधकाम ठेकेदाराच्या हाताखाली सेंट्रींग मजूर म्हणून काम करत होता. मंदा देखील मोलमजुरीचे काम करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. चव्हाण कुटुंबात तीन लहान मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेबाबत बुधवारी नारायण चव्हाण याच्यावर राहुरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक पडोळे करीत आहेत. आपल्या आईला धारदार चाकू तसेच दगडाने जबरदस्त मारहाण करून पळून गेलेल्या बापाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याच्या मुलींनी केली. नारायण चव्हाण हा चारित्र्यावर संशय घेत असल्याने मंदा चव्हाण ही आपल्या लहान मुलाला घेऊन दीपावलीपूर्वी पुणे येथे माहेरी निघून गेली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी नारायण याने पुणे येथून मुलाला घेऊन आल्याने चिमुकल्या मुलाच्या प्रेमापोटी मंदा २४ नोव्हेंबरला मोमीन आखाडा येथे आली होती. २५ नोव्हेंबरला त्याने वाद घालून मंदावर चाकुचे वार केले. मुख्य आरोपी पतीला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मोमीन आखाडा येथे २५ नोव्हेंबरला नारायण चव्हाण याने चारित्र्यावरून वाद घालत पत्नी मंदाच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले. तसेच डोक्यात दगडाने मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणातील मुख्य आरोपी नारायण चव्हाण याला न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर सहआरोपी हरिभाऊ चव्हाण व रुख्मिणी चव्हाण यांना राहुरी न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)