Published on
:
24 Jan 2025, 11:42 pm
Updated on
:
24 Jan 2025, 11:42 pm
कैरो : इजिप्तमध्ये तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीच ‘स्पॉटेड हायना’ ही तरसाची प्रजाती नामशेष झाल्याचे मानले जात होते. मात्र हजारो वर्षांनंतर अखेर इजिप्तमध्ये एक हायना आढळला. त्याने दोन शेळ्यांची शिकार केल्याचेही आढळले. पण दुर्दैवाने या हायनाला एका ट्रकने धडक दिली व इतक्या वर्षांनंतर दिसलेल्या या तरसाचा मृत्यू झाला!
या प्रजातीला ‘क्रोकुटा क्रोकुटा’ असे वैज्ञानिक नाव आहे. ही प्रजाती सहारा वाळवंट असलेल्या आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये आढळते. पण इजिप्तमधून ही प्रजाती पाच हजार वर्षांपूर्वीच लुप्त झाल्याचे मानले जात होते. इजिप्तमधील वातावरण त्यांच्या भक्ष्यासाठी तग धरता येणार नाही इतके कोरडे पडल्याने त्यावेळी ही परिस्थिती उद्भवली. मात्र गेल्या वर्षी एक भटका तरस त्यांच्या नेहमीच्या भटकण्याच्या जागेपासून अतिशय उत्तरेला सहारा वाळवंटात आढळून आला होता. नेहमीच्या मर्यादेपासून शेकडो मैल उत्तरेला हा तरस कसा आला, तो काय करीत होता याचे कुतूहल संशोधकांना होते. तो कदाचित आपल्या शिकारीच्या मागे लागून आला असावा, असा अंदाज आहे. आता सुदान व इजिप्तच्या सीमेपासून 30 किलोमीटरवरील वादी याहमिब येथे काही लोकांनी त्याचा माग काढून त्याला ट्रकच्या धडकेने ठार मारल्याचे दिसून आले आहे. याबाबतची माहिती ‘मॅमलिया’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रजातीचे तरस अनेक वेळा झुंडीत असतात व एका झुंडीत शंभर तरसही असतात. अशी झुंड एखाद्या लहान गेंड्याची किंवा विल्डबिस्टचीही शिकार करू शकते. मात्र छोट्या प्राण्यांची एकट्याने शिकार करण्याचीही क्षमता या तरसांमध्ये असते. त्यामुळे हा तरस एकटाच होता की, त्याच्याबरोबर अन्यही तरस होते हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.