सुनील भुसारा यांना निवडून द्या, त्यांना मंत्री बनवण्याची जबाबदारी माझी - जयंत पाटीलPudhari
Published on
:
17 Nov 2024, 6:29 am
Updated on
:
17 Nov 2024, 6:29 am
विक्रमगड : सुनिल भुसाराला पुन्हा एकदा निवडून दया हा आदिवासी तरुण नेता पुढे आदिवासी खात्याचा मंत्री नक्कीच होईल याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन विक्रमगड येथील भव्य प्रचार सभेत राष्ट्रवादीचे (शप गट) प्रदेश अध्यक्ष जयवंत पाटील यांनी उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वच गोष्टींवर टॅक्स लावून सरकारने जनतेला पिळून काढण्याचा अतिरेक केला असून कफनावर सुद्धा कर लागतो. सरकार फक्त घोषणा करीत असून तिजोऱ्यांमध्ये खडखडाट असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनिल भुसारा यांच्या भव्य प्रचार सभेत ते बोलत होते.
आदिवासीं समाजाचा राखीव निधी सरकारने अन्य योजनांसाठी वळविण्याचे पाप केले असून भुसारा यांना निवडून दिल्यास त्यांना आदिवासी विकास खात्याचे मंत्रिपद देणार असे सूतोवाच पाटील यांनी यावेळी केले. विक्रमगड नगरपंचायतच्या सदस्यांनी यावेळी पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (शप) प्रवेश केला.
बटेंगे तो कटेंगे या महायुती सरकारच्या घोषणेचा उबाठा गटाच्या नेत्या ज्योती ठाकरे यांनी खरपूस समाचार घेत मणिपूर व शेतकरी आंदोलनाची आठवण करून देत विद्यमान सरकारवर सडकून टीका केली. सरकारने दिलेले साडेसात हजार नसून महाराष्ट्राला लागलेली साडेसाती आहे असा घणाघात ठाकरे यांनी केला.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनिल भुसारा प्रचारात आघाडीवर असून भाजपाचे हरिश्चंद्र भोये त्यांचा सामना करणार आहेत. शनिवारी विक्रमगड येथे भुसारा यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी कार्यकर्त्यांनी अक्षरशः तोबा गर्दी केल्याचे पहायला मिळाले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.