रशिया आणि युक्रेन यांच्यातला वाद शांत होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. अशातच रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला करत युक्रेनच्या दक्षिण भागात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. विशेष म्हणजे या हवाई हल्ल्यात रशियाने युक्रेनवर पहिल्यांदाच आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे दोन्ही देशांमधले वातावरण पुन्हा चिघळले असून पुतिन यांनी युक्रेनला टेस्टिंग ग्राउंड बनवलं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की दिली आहे.
युक्रनने काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि ब्रिटेनच्या क्षेपणास्त्रांचा उपयोग करून रशियातील काही ठिकाणांना लक्ष्य केले होते. आता रशियाने या हल्ल्याचा बदला घेतला आहे. रशियाने युक्रनेवर पहिल्यांदाच RS-26 Rubezh हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले. युक्रेनच्या हवाई दलाने या हल्ल्याची पुष्टी केली असून या हल्ल्यामुळे युक्रेनच्या महत्त्वाच्या संस्था, इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की चांगलेच भडकले आहेत. यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पुतिन यांनी युक्रेनला टेस्टिंग ग्राउंड बनवलं आहे. 21 नोव्हेंबर रोजी युक्रेनमध्ये सन्मान आणि स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. हा आमच्यासाठी दोन क्रांतीची आठवण ठेवण्याचा आणि जनतेचा सन्मान करण्याचा दिवस आहे. परंतु या काळात आमचा शेजारी पुन्हा एकदा त्याचे खरे रुप दाखवायला लागला आहे. या हल्यामुळे रशिया किती घाबरलेला आहे हे दाखवून दिले, असे झेलेन्स्की म्हणाले.