पोतराज, वासुदेव सांगताहेत मतदानाचे महत्व, ग्रामीण भागात वेशभूषेतून होतेय जनजागरण; शिक्षण विभागाचा उपक्रम
6 days ago
2
स्वीप या शासनाच्या महत्त्वाकांक्षी मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत खामगाव तालुक्यात मागील निवडणुकीत सर्वांत कमी मतदान झालेल्या गावांमध्ये मतदानाविषयी जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यासाठी गावागावात पोतराज, नवनाथ सह वासूदेवांच्या वेशभूषेत मतदानाचे महत्व पटवून दिले जात आहे. हा कार्यक्रम हा खामगावचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, खामगाव तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी खामगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी गजानन गायकवाड यांनी पुढाकार घेतला. गायकवाड यांनी तालुक्यातील शिक्षण विभागात कार्यरत उपक्रमशील केंद्रप्रमुख, शिक्षक व त्यांचे विद्यार्थी सहकार्याने मतदार जनजागृतीवरच आधारित पथनाट्ये व लोकगीते सादर केली. यात शिक्षक किशोर भागवत यांनी वासुदेव, शिक्षक राजेश कोगदे यांनी नवनाथ तर शिक्षक दिनेश गवई यांनी पोतराज ची भूमिका साकारली. कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख एन. के. देशमुख, केंद्रप्रमुख डॉ. निर्मला जाधव, सुटाळा कन्या शाळेचे मुख्याध्यापक अरुण सावंग, शिक्षक अमोल राजपूत, श्रीदेवी देवगुंडे, निमकवळा शाळेचे मुख्याध्यापक मंगेश पवार, घाटपुरी येथील शिक्षक राजेंद्र सुरवाडे यांनी प्रयत्न केले. सुटाळा कन्या शाळेचे मुख्याध्यापक अरुण सावंग यांनी गीत सादर केले. शंभर टक्के मतदान करण्याचे घेतले वचन खामगाव तालुक्यातील सुटाळा, निमकवळा, घाटपुरी येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर करून सर्व ग्रामस्थांची मने जिंकली. यावेळी त्यांनी सर्व गावकरी १०० टक्के मतदान करू, असे गावकऱ्यांकडून वचन घेतले. ही मतदार जनजागृती रॅली तालुक्यातील घाटपुरी येथून सुरू करण्यात आली. पुढे ही रॅली तालुक्यातील नांद्री, वर्णा, रोहणा, घाटपुरी, किसन नगर आदी भागात जनजागरण केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)