फडणवीस - अजित पवार 'बटेंगे तो कटेंगे' वरून समोरासमोर:अजितदादांना अर्थच कळला नाही -फडणवीस; हे असले इकडे चालणार नाही -पवार
6 days ago
2
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी अजित पवार एकमेकांपुढे उभे टाकलेत. अजित पवारांनी भाजपचा हा नारा महाराष्ट्रात चालणार नसल्याचे विधान केल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवारांना या नाऱ्याचा अर्थच कळला नसल्याची टीका केली आहे. यामुळे महायुतीत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील आपल्या निवडणूक प्रचारात बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला आहे. या नाऱ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांनी उचलून धरले आहे. पण महायुतीतील घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यापासून अंतर राखले आहे. अजित पवार यांनी बटेंगे तो कटेंगे सारखे नारे महाराष्ट्रात चालणार नसल्याचा आरोप केला आहे. 'बटेंगे तो कटेंगे' इकडे नाही उत्तरेत चालेल कुणी काहीही बोलले तरी आम्ही त्याचे समर्थन करत नाही. महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' अजिबात चालणार नाही. ते तिकडे उत्तर भारतात चालेल. महाराष्ट्र हा साधू संतांचा प्रदेश आहे. शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यांचीच शिकवण आमच्या रक्तात भिनलेली आहे. त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाणार, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या विधानापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला. त्याचीही राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे वरून सत्ताधारी महायुतीच दोन भागांत विभागली गेल्याचे चित्र निर्माण झाले. अजित पवारांना नाऱ्याचा अर्थच समजला नाही त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना या नाऱ्याचा अर्थच समजला नसल्याचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस शुक्रवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले, या लोकांना (अजित पवार व पंकजा मुंडे) जनतेच्या भावना समजल्या नसतील. त्यांना काहीतरी वेगळे बोलायचे असेल आणि माध्यमांनी त्याचा काहीतरी वेगळा अर्थ लावला असेल. कदाचित त्यांना योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा अर्थही समजला नसेल. हे लोक लोक योगींशी असहमत असण्याचे 3 पैकी एक कारण असू शकेल. अजित पवारांविषयी बोलायचे तर ते मागील अनेक दशकांपासून ज्या विचारांच्या लोकांसोबत राहिले ते स्वतःला सेक्युलर मानत होते. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याचे ते सांगत आलेत. पण त्यांचे धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखे आहे. हिंदुत्वाचा विरोध म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी विचारधारा असलेल्या लोकांसोबत अजित पवार होते. त्यामुळे जनतेचा कल, राष्ट्रवादी विचार समजून घेण्यासाठी त्यांना काहीसा वेळ लागेल. आता राहिला प्रश्न बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याचा, तर त्याचा अर्थ समाजाला एकसंध ठेवणे असा होतो. त्यात काहीही चुकीचे नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक है तो सेफ है ची घोषणा महामंत्र असल्याचा दावा केला. कारण, पंतप्रधानांनी देशातील समस्त जनतेला एकजूट ठेवण्याचा मंत्र दिला आहे. आपण एकजूट राहिलो तरच आपला विकास होईल असा त्याचा अर्थ होतो. पण काँग्रेस मात्र आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेवर अजित पवार कोणती प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)