फेब्रुवारीअखेरीस ‘समृद्धी’वरील कसारा बोगदा खुला:8 मिनिटांमध्ये घाट पार, शहापूरचा पूल आणि बडोदा जेएनपीटी एक्स्प्रेस वेमुळे झाला होता विलंब
3 hours ago
2
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या चौथ्या आणि सर्वात आव्हानात्मक टप्प्यातील ७६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सप्टेंबर महिन्यात याचे लोकार्पण करण्याचा राज्य शासनाचा मनोदय होता. मात्र, शहापूर येथील ८४ मीटरचा पूल आणि बडोदा- जेएनपीटी एक्स्प्रेस महामार्गाची जोडणी या दोन कारणांमुळे त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. या सर्व जोडण्या पूर्ण झाल्या असून फेब्रुवारीअखेरीस हा बोगदा प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची माहिती सूत्रांनी “दिव्य मराठी’ला दिली. हा बोगदा सुरू झाल्यावर कसारा घाट अवघ्या ८ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे, तर नागपूर-मुंबई अंतर ८ तासांवर येणार आहे. नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांना विभागणारा कसारा घाट समृद्धी महामार्गावरील शेवटच्या टप्प्यातील मोठे आव्हान होते. ८.९३ किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासह अन्य ४ लहान बोगदे, खोल दऱ्यांमधील १६ पूल आणि मुसळधार पावसाचा प्रदेश यामुळे समृद्धी महामार्गावरील हा टप्पा जिकिरीचा होता. देशातील सर्वात रुंद (३५ मीटर) आणि राज्यातील सर्वात लांब (८.९३ किलोमीटर) चा बोगदा आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील आमणे असा हा ७६ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. यातील २६ किलोमीटरच्या लांबीतील अडचणींमुळे हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होण्यात विलंब झाला. बडोदा - मुंबई व नागपूर - मुंबई महामार्ग आमणेत एकत्र बडोदा - जेएनपीटी कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग असलेला बडोदा - मुंबई एक्स्प्रेस वे आणि नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आमणे येथे एकत्र येत आहेत. तेथून हे दोन्ही महामार्ग जेएनपीटीला जोडले गेले आहेत. या जोडणीच्या कामातील विलंब, दुतर्फा असलेले लॉजिस्टिक गोडाउन्सचे विस्थापन आणि आणि शहापूर येथील ८४ मीटर उंंचीचा (सुमारे २८ मजली इमारतीएवढा) पूल यामुळे या पट्ट्यावरील काम मागे पडले होते. सप्टेंबरमध्ये हा बोगदा प्रवाशांसाठी खुला केला जाणार होता. आता तो फेब्रुवारीअखेरपर्यंत होईल, अशी अधिकृत माहिती आता देण्यात आली आहे
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)