नाशिक : घरकामगार मोलकरीण संघटनेच्या अधिवेशनात बाेलताना ॲड. एस. टी. सय्यद. व्यासपीठावर व्ही. जी. धनवटे, दत्ता तुपे, राजू देसले, मीना आढाव, सुनीता कुलकर्णी, राजेंद्र खैरनार आदी.(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
:
31 Jan 2025, 4:15 am
Updated on
:
31 Jan 2025, 4:15 am
नाशिक : घरकामगारांना मोफत घर योजना, दारिद्र्यरेषेखालील कार्डवाटप, कामगारांना वृद्धापकाळासाठी पेन्शन योजना आणि कामगारांसाठी मोफत आरोग्य सुविधेसह त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लागू करावी या मागण्यांसह राज्याच्या अर्थसंकल्पात घरकामगार मोलकरीण संघटनेसाठी100 कोटींची तरतूद करावी, असा ठराव जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला.
अधिवशेनातील मंजूर ठराव
राज्य अर्थसंकल्पात घरकामगार मोलकरणींसाठी १०० कोटींची तरतूद करावी
घरकामगार कल्याण मंडळासाठी पूर्णवेळ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावा
मोलकरणींना वृद्धापकाळी दरमहा पेंशन द्यावी
कामगार कल्याण मंडळाकडून कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती, आरोग्यसुविधा द्याव्यात
घरेलु कामगारांसाठी घरकुल योजना राबवावी. सर्वेक्षण करून दारिद्रयरेषेचे कार्ड द्यावे
'आयटक' संलग्न नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेचे चौथे अधिवेशन गुरुवारी (दि. 30) परशुराम साइखेडकर नाट्यगृहात झाले. अध्यक्षस्थानी ॲड. एस. टी. सय्यद होते. व्यासपीठावर संघटनेचे कार्याध्यक्ष राजू देसले, आयटकचे जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, सचिव दत्तू तुपे, शहराध्यक्ष मीना आढाव, मालेगाव अध्यक्ष सुनीता कुलकर्णी, राजेंद्र खैरनार, राजेंद्र जाधव, भिका मांडे, छाया वराडे आदी उपस्थित होते.
ॲड. सय्यद यांनी घरकामगारांनी आपल्या हक्कासाठी संविधानात नमूद अधिकारासाठी जागृती ठेवावी असे सांगून आयटकच्या माध्यमातून स्वत:चा विकास साधावा असे सांगितले. कामगार महिलांना कायदेशीर बाबींसाठी सल्ला, मार्गदर्शनासाठी आपण बांधिल असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यात मीना आढाव, सुनीता कुलकर्णी, वर्कर्स फेडरेशन मालेगाव, अरुण मस्के आणि ग्रुप यांचा समावेश होता. मीना आढाव यांनी अधिवेशनातील मागण्या वाचून दाखवल्या. प्राजक्ता कापडणे यांनी प्रास्ताविक, राजू देसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महेश चौधरी, मीना जाधव, शिला श्रीवास्तव, मीरा उंडे आदी उपस्थित होते.