बहुरंगी लढती ठरवतील सहा प्रमुख पक्षांचे भवितव्य! कुणाला किती टक्के संधी?

2 hours ago 1

विधानसभा महासंग्राम. file photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

17 Oct 2024, 10:17 am

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्राने याआधी कधी बघितला नाही असा घनघोर रणसंग्राम होणार आहे. २०१९ पर्यंतच्या विधानसभा निवडणुका या चार प्रमुख पक्षांमध्ये लढल्या गेल्या, मात्र गेल्या अडीच वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटले. त्यांचे चार पक्ष बनले. त्यामुळे या विधानसभेचा रणसंग्राम हा सहा प्रमुख पक्षांमध्ये असेल. याबरोबरच तिसरी आघाडी, मनसे तसेच छोटे पक्ष आणि शेकडो अपक्ष उमेदवार अशा बहुरंगी लढती राज्यभर दिसतील.

महायुती व महाविकास आघाडी यांना ५०ः ५० टक्‍के संधी

विधानसभा निवडणूक ही सत्तेवर कोण येणार, यापुरती मर्यादित नसेल. ही निवडणूक सहा प्रमुख पक्षांचे राजकीय भविताव्य ठरवेल. गात राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे भवितव्य ठरवणारी असेल, लोकसभेच्या निवडणुकीत जरी महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या असल्या हरी त्यांना वाटते तेवढी राज्याच्या सत्तेची वाट सोपी नाही. लोकसभेनंतर ज्या पद्धतीने महायुती सरकारने लाडकी बहीण, टोल माफी असे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी यांना ५०:५० टक्के संधी आहे. सहा प्रमुख पक्षांबरोबर विधानसभेच्या लढाईत मनसे, तिसरी आघाडी आणि अपक्ष यांची भूमिका महत्‍वाची असेल, मनसेने महायुतीत प्रवेश केला नसला तरी त्यांच्यात तडजोडी आणि मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. त्यामुळे ठाकरे गटाला फटका बसू शकतो, तर वंचितची तिसरी आघाडी जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करतील.

फडणवीस यांच्या नेतृत्वाचा कस लागणार

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १२३ जागा तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. १० वर्षांत भाजपच्या जागा जिंकण्याचा आलेख उतरता आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ ९ जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या जागा १०० पेक्षा कमी होतील, अशी राजकीय परिस्थिती आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने ओबीसी घटकांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले असून ओबीसी कार्ड भाजपला किती तारणार हे कळेल. विदर्भात भाजपला काँग्रेसशी टक्‍क्‍र द्यावी लागेल. मुंबईत ठाकरे गट आणि काँग्रसशी त्यांची लढत असेल, भाजपने ८० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर महायुतीचे सरकार येईल. कारण भाजप १५० पेक्षा जास्त जागा लढणार आहे. त्यामु‌ळे भाजप ८० प्लस, शिंदे गट ४० प्लस, अजित पवार गट २५, अशा जागा जिंकल्या तर महायुतीचे गणित जुळेल.

एकनाथ शिंदेसमोर नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान

केवळ अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पाडून बनलेला पक्ष महणजे शिंदे गट. ४० आमदार असलेल्या शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीत ७ जागा जिंकल्या आणि आपले अस्तित्व दाखविले, पण त्यांच्यासाठी खरी लढाई विधानसभा निवडणुकीची आहे. त्यांची मुख्य लढत ही ठाकरे गटाशी होणार आहे. त्यात ते यशस्वी झाले तर राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा निर्माण होईल. आपल्या सोबत आलेल्या आमदारांना निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. तसेच त्यांची पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी त्यांनी काही अपक्षांना रसद पुरवली आहे. यावेळी भाजप त्यांना मुख्यमंत्री करण्याची शक्यता कमी आहे. पण आकडे जर त्यांच्या बाजूने पडले तर पुन्हा आपले नशीब आजमावण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण, टोल माफी असे अनेक लोकप्रिय निर्णय घेऊन त्यांनी राज्यात वातावरण तयार केले आहे,

अजित पवारांचा शरद पवारांसमोर टिकाव लागेल का?

अजित पवार यांनी बंड करून ४१ आमदार स्वतः सोबत आणले. पक्ष व चिन्ह दोन्ही मिळाले, पण तरी लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षातून शरद पवार गटात जाण्यासाठी सध्या रीघ लागली आहे. त्यामुळे अजित पवार गट किती जागा जिंकते हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण आणि मराठी संस्कृती यांच्याबद्दल काहीही माहिती नसलेले खासगी कंपन्यांचे चाणक्य नेमून ते विधानसभेला सामोरे जात आहेत. केवळ गुलाबी रंगाचे फेटे चढवून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यामुळे त्यांना ही आपले अस्तित्व सिद्ध करण्याची संधी आहे. ते किती जागा जिंकून आणतात, यावर त्यांचे राजकीय मूल्य ठरेल. त्यांच्या उमेदवारांना शरद पवार यांनी घेरले आहे. शरद पवार यांच्या रणनीतीला अजित पवार हे कसे उत्तर देतात याकडे लक्ष असेल, अजित पवारांचा शरद पवारांसमोर टिकाव लागेल का? या प्रश्नाचे उत्तर निकालानंतरच कळेल.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची लढाई

लोकसभा निवडणु‌कीत उद्धव ठाकरे हे प्रचारात आघाडीवर होते. पण त्यांना तसे यश मिळाले नाही. त्यांचे मित्र पक्ष काँग्रस आगि शरद पवार गटाला जास्त यश मिळाले. ठाकरेंचे ४० आमदार फुटलेले आहेत. त्यामुळे उमेदवार शोधण्यापासून त्यांना काम करावे लागत आहे. फुटलेल्या ४० आमदारांचा पराभव करण्याला त्यांचे प्राधान्य आहे. त्यांना जास्त जागा हव्या आहेत, पण त्यांची संघटना मुंबई, ठाणे कोकणात कमकुवत झाली आहे. त्यातच त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या; पण हाती निराशा आली. निवडणुकीत ठाकरेंना अस्तित्व सिद्ध करावे लागेल.

काँग्रेसचे भवितव्य कठोर मेहनतीवर अवलंबून

लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात वातावरण निर्मिती करण्यात आघाडीवर त्याचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाला होता लोकसभा निवडणूक म्‍हणजे विधानसभा नाही. त्यामुळे केवळ राहुल गांधी यांच्या करिष्म्यावर अवलंबून काँग्रेसला राहता येणार नाही. काँग्रेसचे नेते किती घाम गाळतात यावर अवलंबून आहे. अनेक मातब्बर नेते काँग्रेस सोडून गेले आहेत. राज्यभर प्रभाव असणारा असा एकही नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तयार झालेल्या वातावरणाचा काँग्रेस कसा फायदा उठवते हे पहावे लागेल.

पवारांच्या खेळीकडे राज्याचे लक्ष

सगळ्यांचे लक्ष आहे ते शरद पवार यांच्या खेळीकडे, शिवसेने प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. पक्षही गेले, चिन्हही गेले; पण शरद पवार यांनी पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील जुन्या राजकीय घराण्यांना सोबत घेतले. त्यांनी राजकीय कौशल्य दाखवून लोकसभा निवडणुकीत १० जागा लढवून ८ जागा जिंकल्या, विधानसभेसाठी तर अजित पवार गटाच्या आमदारांनी प्रवेशासाठी त्यांच्याकडे रिघ लावली आहे. उमेदवार हेरून त्यांनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची योजना आखली आहे. अजित पवार गटाला पराभूत करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीने ते मैदानात उतरले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article