मुलुंड विधानसभा मतदारसंघ : भाजपचा गड अभेद्य राहणार की महाविकासआघाडी बाजी मारणार?

2 hours ago 1

Mulund Assembly constituency 2024 : मुंबईच्या उत्तरेला ठाण्याच्या वेशीवर असलेला मतदारसंघ म्हणून मुलुंड विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते. या मतदारसंघात 1990 पासून तब्बल 28 वर्षे सलग भाजपचा उमेदवार बाजी मारताना दिसत आहे. 1967 पासून 1985 पर्यंत या मतदारसंघात अनुक्रमे काँग्रेस जनता पार्टी, काँग्रेस यांची सत्ता होती. मात्र 1990 पासून या मतदारसंघांत भाजपची अभेद्य सत्ता आहे. मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात उच्चभ्रू, मध्यम आणि गरीब कुटुंबाची संमिश्र वस्ती आहे. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय अशी बहुभाषिक लोक येथे सर्वाधिक राहतात. तसेच मुलुंड डम्पिंग ग्राऊंडचा मुद्दाही गेल्या अनेक वर्षांपासून गाजताना दिसत आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

मुलुंडच्या मतदारांचे प्रमुख प्रश्न

मुलुंड विधानसभा मतदारसंघात एकूण 289 मतदान केंद्र आहेत. मुलुंड पूर्वेकडील नवघर, मिठागर, गव्हाणपाडा, निर्मलनगर हा परिसर येतो. तर पश्चिमेकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते मुलुंड कॉलनीपर्यंत मुलुंडचा विस्तार झाला आहे. मुलुंडमध्ये मराठीसोबतच गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या जास्त आहे. मुलुंडचा बराचसा भाग हा जंगलानं वेढलेला आहे. त्यासोबतच वर्षानुवर्षे मुलुंडमध्ये राहणारे रहिवाशी हे डम्पिंग ग्राऊंडला कंटाळले आहेत. याठिकाणी गुजरात आणि मराठी असा भाषिक वाद अनेक वर्षांपासून आहे.

मुलुंडचा इतिहास आणि राजकीय समीकरणे

मुलुंड विधानसभा मतदारसंघात 1967 आणि 1972 या काळात काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर 1978 मध्ये जनता पार्टीने या मतदारसंघातून विजय मिळवत मतदारसंघ काबीज केला. पण त्यानंतर 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा ताकद लावत मतदारसंघ खेचून आणला.

यानंतर 1990 ला वामनराव परब यांनी भाजपमधून निवडणूक लढत बाजी मारली. यापाठोपाठ 1995 मध्ये किरीट सोमय्या हे मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले. यानतंर 1999 ते 2014 या काळात सरदार तारा सिंग हे सलग चार टर्म आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी ही जागा लढवली नाही. त्यामुळे 2019 मध्ये मिहीर कोटेचा यांनी या जागेवरुन निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले.

यानंतर 2020 साली सरदार तारासिंह यांचं निधन झालं. सरदार तारासिंह यांचे मुलुंड परिसरात मोठं नाव होतं. त्यांनी या मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. अरुंद रस्ते, सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा, उद्यानांची विकासकामांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. मिहीर कोटेचा यांना याचाच फायदा झाला आणि ते जिंकून आले. एक कार्यकर्ता, नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. गेल्या 30 वर्षात या मतदारसंघात भाजपचा गड भक्कम करण्यामागे सरदार तारासिंह यांचा मोठा वाटा आहे. मिहीर कोटेचा यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. पण ते अपयशी झाले.

मुलुंड मतदारसंघात यंदा कडवी लढत

गेल्या कित्येक वर्षांपासून या मतदारसंघात भाजपची सत्ता कायम आहे. मात्र सध्या राजकीय समीकरणं बदलली आहेत. सध्या मुलुंडमध्ये गुजराती विरुद्ध मराठी असा भाषिक वाद आहे. भाजपाकडून जर मिहिर कोटेचा यांना उमेदवारी मिळाली तर विरोधक मराठी चेहरा देण्याच्या तयारीत आहेत. पण या जागेसाठी महाविकासाआघाडीतून काँग्रेस आग्रही आहे. यात चरणसिंग सप्रा आणि राकेश शेट्टी यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीकडून जर मराठी चेहरा पुढे करण्यात आला तर भाजपकडे प्रभाकर शिंदे आणि प्रकाश गंगाधरे असे दोन उमेदवार आहेत. त्यामुळे यंदा मुलुंड मतदारसंघात कडवी लढत पाहायला मिळणार आहे.

या मतदारसंघात एकूण २८९ मतदारसंघ आहेत. हा खुला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात २ लाख ९८ हजार २४२ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ५५ हजार ९०३ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या १ लाख ४२ हजार ३३६ इतकी आहे. येत्या निवडणुकीत मुलुंड विधानसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article