Published on
:
15 Nov 2024, 12:32 pm
Updated on
:
15 Nov 2024, 12:32 pm
दीपेश सुराणा
मधुमेह हा आजार सर्व वयोगटात होत असून त्यापासून लहान मुले देखील मागे राहिलेली नाही. पिंपरी-चिंचवड परिसरात बालरुग्णांमध्ये या आजाराचे प्रमाण 3 ते 7 टक्क्यांपर्यंत आढळत आहे. तर, गर्भवती महिलांमध्ये त्याचे प्रमाण 8 टक्क्यांपर्यंत आहे, निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे.
सध्या मधुमेह किंवा डायबिटीस हा आयुष्यभर सोबत राहणारा आजार किंवा आरोग्यविषयक समस्या बनली आहे. जेव्हा शरीर रक्तातील साखरेचा पूर्णपणे वापर करत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 1980 मध्ये डायबिटीस असलेल्यांचा आकडा 10.8 कोटींपर्यंत होता. तो वाढून 2014 मध्ये 42.2 कोटींवर पोहोचला आहे. 1980 मध्ये जगभरात 5 टक्क्यांपेक्षा कमी प्रौढांना (18 पेक्षा अधिक वयाचे) डायबिटीस होता. 2014 मध्ये हे प्रमाण 8.5 टक्के इतके होते.
देशामध्ये चाळीशी ओलांडल्यानंतर मधुमेह होण्याचे प्रमाण जास्त आहे. जवळपास 32 ते 36 टक्क्यांपर्यंत हे प्रमाण असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे. बदलती जीवनशैली, बैठे काम, आहारामध्ये फास्टफूड आणि जंकफूडचा वाढलेला वापर, अनुवंशिकता अशा विविध कारणांमुळे मधुमेहाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
गर्भवती महिलांमध्ये मधुमेह होण्याची कारणे
गर्भवती महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सरासरी 8 टक्क्यांपर्यंत आहे. प्रसुतीची वेळी जास्त वय असणे, प्रसुतीदरम्यान जुळ्या मुलांचा जन्म, पहिल्या प्रसुतीच्या वेळी रक्तातील साखर वाढली असल्यास त्या महिलांना मधुमेहाचा त्रास संभवतो.
पिंपरी-चिंचवड परिसरात मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणीसाठी दररोज जर 20 रुग्ण येत असतील तर त्यापैकी सरासरी 10 ते 12 रुग्णांना मधुमेह असल्याचे आढळत आहे. लहान मुलांमध्येही हा आजार आढळत असून त्याचे प्रमाण 3 ते 7 टक्क्यांपर्यंत आहे. चाळिशीनंतर मात्र हा आजार होण्याचे प्रमाण 32 ते 36 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.
डॉ. सायली तुळपुळे, मधुमेह तज्ज्ञ.