बाळासाहेबांचा शब्द म्हणजे आदेशच:मराठी माणसांची संघटना ते सत्ताधारी पक्ष; केव्हा अन् कशी झाली शिवसेनेची स्थापना? वाचा

2 days ago 2
शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख राजकीय पक्ष... 1966 मध्ये या पक्षाची स्थापना झाली. पण आता 58 वर्षांनंतर शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. मूळ शिवसेना पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंकडे आहे. शिवसेनेत ठाकरे कुटुंबीयांची एकाधिकारशाही होती. बाळासाहेबांचा शब्द हाच आदेश होता. पण त्यानंतरही अनेकजण त्यांच्याविरोधात गेले. मात्र त्यापैकी कुणीही पक्षावर दावा सांगितला नाही. पण एकनाथ शिंदेंनी केवळ शिवसेनेवर दावाच सांगितला नाही, तर त्यांनी ती मिळवूनही दाखवली. चला तर मग 'राजकीय पक्षांचा इतिहास' या आपल्या स्पेशल सीरिजमध्ये सर्वप्रथम पाहूया शिवसेनेची वाटचाल... मराठी अस्मितेचे राजकारण करणारा हा भगवा पक्ष महाराष्ट्रात कसा वाढला? याचा सविस्तर धुंडाळा घेऊया दिव्य मराठी डिजिटलसोबत... बाळासाहेब ठाकरे यांच्या 'मार्मिक'च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यातूनच शिवसेना पक्षाची महुर्तमेढ रोवली गेली. या साप्ताहिकाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. यातूनच शिवसेनेच्या जन्माची बीजं रोवली गेली. 19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाला एक कलाटणी मिळाली. शिवसेनेच्या स्थापनेवेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी भाषणात मी हे बाळ तुम्हाला दिले असे म्हटल्याचे काही राजकीय जाणकार सांगतात. त्यानंतर मराठी लोकांनी या संघटनेचे सदस्यत्व मिळावे यासाठी धडपड सुरू झाली. समाजवादी पक्षासोबत पहिली युती शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या 4 महिन्यांतच पक्षाचा पहिला दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. सुरूवातीला समाजकारण करणाऱ्या शिवसेनेने 1967 मध्ये ठाण्यातून पहिल्यांदा निवडणूक लढवली. तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही शिवसेनेकडून करण्यात आला. शिवसेनेने पहिली राजकीय युती केली ती समाजवादी पक्षासोबत केली होती. त्यानंतर शिवसेनेने मुंबई मनपा निवडणूक लढवली, आणि मनपात प्रवेश केला. यावेळी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखा स्थापन होऊ लागल्या होत्या. या शाखांमधून मराठी जनतेचे प्रश्न सोडवले जावू लागले. परिणामी शिवसेनेच्या शाखांपुढे जनतेची रीघ लागू लागली. ...अन् बाळासाहेबांना अटक झाली 1968-69 या वर्षांत राज्यात सीमा प्रश्न पेटला होता. यात मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला असला तरी कर्नाटकात गेलेला मराठी भाषिक भाग पुन्हा मिळावा, ही मराठी जनतेची आणि शिवसेनेची प्रमुख मागणी होती. सीमा प्रश्न खदखदत होता. सीमा प्रश्न सुटेपर्यंत केंद्रातील एकाही मंत्र्याला मुंबई व महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर 1968 साली परळच्या कामगार मैदानावरून दिला होता. मोरारजी देसाई तेव्हा उपपंतप्रधान होते. त्यांचा मुंबई दौरा जाहीर झाला. मुळात मोरारजीभाईंबद्दल मराठी लोकांत राग होता. ते मराठीद्वेष्टे आहेत, महाराष्ट्राविषयी त्यांच्या मनात अढी आहे, असे सर्वांना वाटत होते. ते 8 फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर पोहोचले. तेथून कारने दक्षिण मुंबईत येत असताना माहिम चर्चपाशी शिवसैनिकांनी त्यांची कार अडवली. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला, त्यात अनेक शिवसैनिक जखमी झाले; पण त्यामुळे वातावरण खूपच तापले. पोलिसांनी बाळासाहेब ठाकरे, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी आदींना अटक केली. यामुळे मुंबई बंद झाली होती. शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला शिवसेनेची स्थापना व्हायची होती, त्यावेळी मुंबईत कामगार संघटनांचा मोठा प्रभाव होता. या कामगार संघटनांचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाचे नेते करत होते. शिवसेनेची स्थापना झाली आणि मग त्यानंतर शिवसेना आणि डावे असा संघर्ष सुरू झाला, वर्चस्वाची लढाई सुरू झाली. हा संघर्ष टोकाला गेला आणि त्यातूनच कम्युनिस्ट नेते, परळचे तत्कालीन आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली. 5 जून 1970 च्या रात्री परळचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर झाला होता. मारेकऱ्यांना शिक्षा झाली, मात्र शिवसेना, बाळासाहेबांवरील एकही आरोप सिद्ध झाला नाही. यानंतर देसाईच्या परळ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक यांनी कृष्णा देसाई यांच्या पत्नीचा पराभव करत विजय मिळवला. 1971 मध्ये मुंबई मनपाचा महापौर 1968 मध्ये मुंबई मनपामध्ये नगरसेवक निवडून आले असले तरी शिवसेनेची सत्ता मुंबई मनपात सत्ता नव्हती. कृष्णा देसाई यांची हत्या आणि शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आल्यानंतर शिवसेनेने 1971 मध्ये मुंबई मनपात आपला पहिला महापौर म्हणून दादरचे डॉ. हेमचंद्र गुप्ते यांची निवड केली. पहिले महापौर असताना देखील गुप्ते यांनी पुढच्या काळात शिवसेनेची साथ सोडली. त्यांच्यानंतर सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडीक, छगन भुजबळ, रमेश प्रभू, सी. दिवाकर रावते, नंदू साटम, हरेश्वर पाटील, सुनील प्रभू ते किशोरी पेडणेकर असे अनेक जण महापौर झाले. 1980 शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा बाळासाहेब ठाकरे यांनी 1975 मध्ये इंदिरा गांधींच्या आणीबाणीला पाठिंबा दिला आणि त्यानंतर 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला.1980 मध्ये शिवसेनेने विधानसभा निवडणूक न लढवता काँग्रेसला पाठिंबा दिला होता. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी मविआमध्ये काँग्रेसला सोबत घेत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याने त्यांच्यावर हिंदुत्व सोडले अशी टीका अनेकदा करण्यात आली. मात्र काँग्रेसला आणी बाणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. सतीश प्रधान ठाण्यात महापौर महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आणि तळ्यांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराने सतत शिवसेनेला साथ दिली. शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली अन् दुसऱ्याच वर्षी (1967) सत्ता मिळाली ती ठाण्यात. तेव्हापासून ठाणे आणि शिवसेना हे जणू समीकरणच होऊन बसले. ठाणे महानगरपालिका 1982 साली स्थापन झाली. पहिला महापौर होण्याचा मान शिवसेनेच्या सतीश प्रधान यांना मिळाला. पुढे सेनेतल्या अंतर्गत हेव्यादाव्यातून सेनेची सत्ता गेली. 1993 मध्ये अनंत तरे हे महापौरपदी निवडून आले आणि तेव्हापासून शिवसेनेकडे ठाणे महानगरपालिकेची सत्ता कायम राहिली. मोरेश्वर सावे पहिले खासदार 1989 मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून मशाल चिन्हावर शिवसेनेचे पहिले खासदार म्हणून मोरेश्वर सावे हे लोकसभेत गेले. त्‍यांनी 1989 ते 91 व 1991 ते 96 असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले. 1990 मध्ये शिवसेनेला 52 जागा, भाजपच्या खात्यात 42 जागा बाळासाहेबांच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप जास्त जागा लढवणार, तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा मिळतील, असा निर्णय युतीच्या वेळीच घेण्यात आला होता. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकूण 288 जागांपैकी 183 जागा लढवल्या होत्या. तर भाजपने 104 जागांवर उमेदवार उभे केले. त्या निवडणुकीत शिवसेनेला 52 तर भाजपला 42 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले. 1991 मध्ये शिवसेनेत मोठे बंड शिवसेन पक्षात सर्वांत मोठे बंड झाले ते 1991 मध्ये. यावेळी शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांनी 12 आमदारांसह काही नगरसेवक व पदाधिकारी फोडले. माझगाव मतदारसंघातून निवडन आलेले भुजबळ तेव्हा नगरसेवकही होते. त्यावेळी शिवसेनेकडे राज्याचे विरोधी पक्षनेतेपद चालून आले होते. पण बाळासाहेब ठाकरे यांनी या महत्त्वाच्या पदावर मनोहर जोशींची निवड केली. यामुळे भुजबळ दुखावले गेले. यावेळी शिवसेनेच्या 18 आमदारांनी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरींना पत्र लिहून वेगळागट – शिवसेना (बी) स्थापन करण्याची परवानगी मागतली होती. ती परवानगी मिळाली देखील मात्र, यातील 12 जणांनी काँग्रेस-आय पक्षात प्रवेश केला. गणेश नाईकांची सेनेला सोडचिठ्ठी 1995 साली पहिल्यांदाच राज्यात युतीचे सरकार आले. बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले. युतीची सत्ता 1999 पर्यंत राहिली. त्यात नारायण राणेंना देखील मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. यावेळी नवी मुंबईतील गणेश नाईक यांना पर्यावरण खात्यासह ठाण्याचे पालकमंत्रपद देण्यात आले. पण त्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वकांक्षा होती. पण 1999 च्या निवडणुकीत युतीची सत्ता गेली. काँग्रेसने पुन्हा सरकार स्थापन केले. सत्ता जाताच गणेश नाईक यांनी शिवसेनेला राम राम ठोकला आणि नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2003 मध्ये उद्धव ठाकरेंवर कार्यध्यक्षपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीपासून राजकारणात सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 2002 च्या मुंबई महापालिका निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवली. त्यावेळी राज ठाकरेंच्या समर्थकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या. 2003 मध्ये महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचे अधिवेशन होते. हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचे होते. कारण या अधिवेशनात बाळासाहेब ठाकरे आपला उत्तराधिकारी कोण? हे जाहीर करणार होते. यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही नावे चर्चेत होती. राज ठाकरे तेव्हा विद्यार्थी सेनेचे काम करत होते. त्यांनी महाराष्ट्रभर आपले वेगळे वलंय निर्माण केले होते. राजकीय वर्तुळात तेच बाळासाहेबांचे राजकीय वारसदार असणार अशी चर्चा सुरू होती. पण ऐनवेळी शिवसेना कार्याध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. स्वतः राज ठाकरे यांनी ही घोषणा केली. या निवडीनंतर राज ठाकरे यांची शिवसेनेत पिछेहाट सुरू झाली आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. 2004 मध्ये संजय निरुपम यांना सोबत घेत उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. पण राज ठाकरे यांच्या समर्थकांनी जोरदार राडा घालत उत्तर भारतीयांना मारहाण केली. 2005 मध्ये शिवसेनेतील बंडखोरीनंतर भाजपने मागितले विरोधी पक्षनेतेपद 1999 मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असतानाही 2004 मध्येही शिवसेना आणि भाजपने एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेला 62 तर भाजपला 54 जागा मिळाल्या. जास्त जागा जिंकल्याने पुन्हा एकदा शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. मात्र, नारायण राणे 2005 मध्ये डझनभर आमदारांसह काँग्रेसमध्ये गेल्यावर भाजपने शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता, मात्र शिवसेनेने तो फेटाळून लावला. नारायण राणेंचा पक्षाला जय महाराष्ट्र नारायण राणे यांनी वयाच्या विशीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. छगन भुजबळ यांच्या बंडानंतर नारायण राणे यांचे पक्षातील वजन वाढले. 1995 ते 1999 च्या काळात युतीचे सरकार असताना त्यांच्याकडे महसूलसारखे महत्त्वाचे खाते देण्यात आले होते. त्यानंतर मनोहर जोशींना काही कारणांमुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी, नारायण राणे यांना 9 महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद मिळाले. मात्र, उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत 15 उमेदवारांची नावे बदलणे, शिवसेनेत उद्धव ठाकरेंचे वजन वाढणे अन् बाळासाहेब ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड करणे या सर्व गोष्टीमुळे नारायण राणे शिवसेनेपासून दूर होत गेले. यातच कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली. यात राणेंचे घर जाळले गेले. मात्र, शिवसेनेचा कोणताही नेता त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही. अखेर 2005 मध्ये 10 आमदारांसह नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज ठाकरेंनी मांडली वेगळी चूल नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेशानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात दौरा टाळल्याचे वृत्त सामनात छापून आले. त्यात राज ठाकरेंच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला. यातच नारायण राणेंच्या मतदारसंघात पोट निवडणूक लागली. बाळासाहेब ठाकरेंनी तिथे सभा घेतली. पण या सभेला राज ठाकरे यांनी दांडी मारली. त्यांची ही गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीचा निकाल आला आणि त्यात नारायण राणे विजयी झाले. यानंतर राज ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेला सोठचिठ्ठी दिली. यावेळी राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही, उलट राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांची गाडी फोडली. यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे बाहेर पडल्यामुळे केवळ शिवसेना नाहीतर दस्तुरखुद्द ठाकरे कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला होता. 2009 मध्ये मनसेमुळे मोठा फटका नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने पहिली निवडणूक लढवली ती 2009 मध्ये. यावेळी शिवसेनेचे 44 उमेदवार निवडून आले, तर मनसेचे पहिल्याच निवडणुकीत 13 उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनेला जवळपास 16.26 टक्के मतदान झाले होते. तर मनसेला 5.71 टक्के मतदान पडले होते. यातील अनेक मतदारसंघात शिवसेना आणि मनसेच्या उमेदवाराला पडलेले मतदान एकत्रित केले तर ते विजयी उमेदवारापेक्षा जास्त होते. या निवडणुकीत मनसेचा सर्वाधिक फटका हा शिवसेनेच्या उमेदवारांना बसला. दोन्ही ठाकरेंच्या पक्षाला यावेळी पडलेले मतदान हे सर्वाधिक 82 आमदार निवडून आलेल्या काँग्रेसपेक्षा साडेचार लाखाने जास्त होते. 2009 मध्ये भाजप ठरला मोठा भाऊ 2009 मध्ये सलग दुस-यांदा विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र भाजपने पहिल्यांदाच शिवसेनेला मागे टाकले होते. या काळात भाजपला 46 तर शिवसेनेला 45 जागा मिळाल्या. या दरम्यान भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. 2012 मध्ये बाळासाहेबांचे निधन शिवसेनेच्या स्थापनेपासूनच पक्षाचे अध्यक्ष असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 मध्ये निधन झाले. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय? असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी सक्षमपणे पक्ष सांभाळला. यावेळी भाजपसोबत असलेली युती तुटली तरीही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 2014 मध्ये 63 आमदार निवडून आले. 2009 च्या तुलनेत शिवसेनेचे 19 आमदार जास्त निवडून आले. या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पुन्हा युती केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. पण जागावाटप मनाजोगे न झाल्याने भाजप व शिवसेना युती संपुष्टात आली. स्वबळावर निवडणूक लढवूनही शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि इथूनच राजकीय भावकीची भाकरी फिरवली गेली. उद्या शिवसेनेच्या राजकीय इतिहासाच्या दुसऱ्या भागात आपण पाहूया शिवसेनेचा उद्धव ठाकरे ते एकनाथ शिंदेंपर्यंतचा प्रवास...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article