Published on
:
29 Jan 2025, 6:02 pm
Updated on
:
29 Jan 2025, 6:02 pm
यवतमाळ : २७ फेब्रुवारी २०२४ ला एसीबीसी आरक्षण मंजूर झाले, त्यानंतर बिंदुनामावली तपासणीसाठी यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी वेगळा शासन निर्णय लावत आहे. या सहाही जिल्ह्यांमध्ये बिंदुनामावली अद्ययावत झालेली नाही. यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रियेमधून यवतमाळ जिल्हा बाद झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात हजारो शिक्षकांची पदे रिक्त असताना व हजारो बेरोजगार शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असताना यवतमाळ जिल्हा या प्रक्रियेतून बाद झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
यवतमाळसह राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, पालघर या सहा आदिवासी बहुल जिल्ह्यांचा यात तत्काळ समावेश व्हावा व तत्काळ शासनाने वेगळा निर्णय घेऊन हे सहाही जिल्हे पवित्र पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यासाठी यवतमाळ जिल्हा खासगी शिक्षक संचालक मंडळाने शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर ची भेट घेऊन निवेदन दिले आहे. या परिस्थितीवर तत्काळ मार्ग काढण्यात येण्याचे वचन यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.
यावेळी वसंतराव घुईखेडकर, प्रवीण देशमुख, रवींद्र फडणवीस, गणेश मोरे, जयंतराव धोगे, अनिल गायकवाड, सिद्धार्थ भारती, आशिष महल्ले, धामणकर यांच्यासह अनेक शिक्षण संचालक पदाधिकारी उपस्थित होते.