बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ फिरवली आहे. File Photo
Published on
:
15 Nov 2024, 1:12 am
Updated on
:
15 Nov 2024, 1:12 am
कोल्हापूर ः यापूर्वी महाविद्यालयांकडून राबविण्यात येणारे बीबीए, बीसीए, बीएमएस व बीबीएम अभ्यासक्रमांचे प्रवेश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने यंदापासून स्वत:च्या अखत्यारित घेऊन सीईटी सेलमार्फत राबविले. लांबलेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमुळे यंदा सुमारे 57 हजार 314 प्रवेश जागा रिक्त राहिल्या आहेत. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
‘एआयसीटीई’ने 2024-25 शैक्षणिक वर्षापासून बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीबीएम हे व्यावसायिक अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेतले. बीबीए अभ्यासक्रमासाठी 50 हजार 408 जागा आणि बीसीए अभ्यासक्रमासाठी 41 हजार 700 जागा उपलब्ध होत्या. अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटीच्या माध्यमातून एप्रिल व मेमध्ये राबविण्यात आली. बारावीच्या निकालानंतर सीईटीचा निकाल लागला. बारावी उत्तीर्ण अनेकांना सीईटीची माहिती झाली नसल्याने विद्यार्थी, पालकांनी अतिरिक्त सीईटी घेण्याची मागणी केली. त्यानुसार 4 ऑगस्ट रोजी अतिरिक्त सीईटी परीक्षा घेण्यात आली. सप्टेंबर महिन्यात पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवली गेली. बीबीए, बीसीए प्रवेशासाठी 44 हजार 177 पात्र विद्यार्थी अंतिम यादीत पात्र ठरले. त्यापैकी केवळ 34 हजार 794 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतरही हजारो प्रवेश जागा रिक्त राहिल्याने ग्रामीण भागातील काही महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
राज्यातील प्रवेशाची स्थिती...
बीबीए, बीएमएस, इंटिग्रेटेड बीबीए-एमबीएसाठी उपलब्ध जागा : 50 हजार 408
बीसीए, इंटिग्रेटेड बीसीए-एमसीएसाठी उपलब्ध जागा : 41 हजार 700
बीबीए, बीसीए प्रवेशासाठी पात्र विद्यार्थी अंतिम यादी : 44 हजार 177
राज्यातील एकूण रिक्त जागा - (कॅप, मायनॉरिटी, संस्था लेव्हल) : 57 हजार 314