Published on
:
20 Nov 2024, 3:14 pm
Updated on
:
20 Nov 2024, 3:14 pm
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील भंडारा, साकोली आणि तुमसर या तीनही विधानसभा क्षेत्रासाठी बुधवारी (दि.२०) मतदान शांततेत पार पडले. रात्री उशिरापर्यंत मतदानाची अधिकृत टक्केवारी येण्यास होती. तरीसुद्धा सरासरी ७२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतदान केंद्रावर नवमतदारांसह वृद्ध, महिला, दिव्यांग, आणि तृतीयपंथीयांचाही सहभाग दिसून आला.
तीनही मतदारसंघात एकूण ५० उमेदवार असून १० लाख १६ हजार ८७० मतदारांची संख्या आहे. ११६७ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७ ते सकाळी ९ वाजतापर्यंत तीनही मतदारसंघात ६ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजतापर्यंत टक्केवारीत वाढ होऊन ती १५ टक्क्यांपर्यत पोहोचली. दुपारी १ वाजतापर्यंत ३५.०६ टक्के मतदान झाले होते. दुपारी ३ वाजतापर्यंत ही टक्केवारी ५१.३२ वर पोहोचली होती. तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६५.८८ टक्के मतदान झाले. काही केंद्रांवर उशिरापर्यंत मतदार असल्याने मतदानाची प्रक्रिया सुरूच होती. त्यामुळे सरासरी ७२ टक्के मतदान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हिवाळ्याचे दिवस असल्याने दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत गेली. सकाळी मतदारांची गर्दी कमी असली तरी दुपारनंतर मात्र मतदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत नवमतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. अनेक नवमतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदानात सहभाग घेतला. मतदान केंद्रावर नवमतदारांसह वृद्ध, महिला, दिव्यांग, आणि तृतीयपंथीयांचाही सहभाग दिसून आला. वृद्ध व दिव्यांगांना व्हिलचेअरच्या मदतीने मतदान केंद्रात आणले गेले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी, मतदारांमध्ये जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले.
८८ वर्षीय महिला मतदानापासून वंचित
मतदानासाठी मतदान केंद्रावर गेलेल्या एका ८८ वर्षीय महिलेला तिचा मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. हा प्रकार पवनी शहरात घडला. माधुरी चोरघडे ही महिला आपल्या मुलासह मतदान केंद्रावर गेली. आपले मतदार ओळखपत्र तिने तेथील कर्मचाऱ्यास दाखविले. परंतु, मतदान कर्मचाऱ्याने मतदार यादी तपासली असता त्या महिलेचे नाव डिलेट केल्याचा स्टॅम्प दिसून आला. सदर महिलेचे नाव का डिलेट करण्यात आले, याबाबत कोणतेही कारण सांगण्यात आले नाही. परिणामी, सदर महिला मतदानापासून वंचित राहिली. या प्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवडणूक कर्मचाऱ्याची खालावली प्रकृती
विधानसभा मतदान केंद्र प्रकाश हायस्कूल अड्याळ येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कैकाडे, आरोग्य पर्यवेक्षक बोंद्रे यांनी बुथवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक विचारणा केली. पवनीजवळील भेंडाळा येथील बुथवरील कर्मचाऱ्यांची उच्च रक्तदाबाने प्रकृती खालावल्याने तातडीने आरोग्य सेवा डॉक्टर धनश्री खंडाइत यांचेमार्फत देण्यात आली व कर्मचाऱ्यास रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले.
२० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी सुरू होईल. तुमसर मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय तुमसर येथे, भंडारा विधानसभेची मतमोजणी पोलिस बहुउद्देशीय सभागृह भंडारा येथे आणि साकोली मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय साकोली येथे होणार आहे.
कर्मचारी मतदानापासून वंचित
निवडणूक प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट मतदानासाठी फॉर्म नंबर १२ भरून दिला. शेवटचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर टपाली मतपत्रिका मतदान सुरू झाले. दरम्यान, अनेकांनी बॅलेट न मिळाल्याची तक्रार जिल्हा निवडणूक विभागाकडे केली होती. १९ नोव्हेंबर रोजी निवडणूक कर्तव्यावर जाणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना मतदानासाठी पोस्टल बॅलेट न मिळाल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे.
गोवारी समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले. अनेक वर्ष पाठपुरावा करुनही त्यांच्या मागण्या बेदखल केल्याने अखेरीस जिल्ह्यातील गोवारी समाजाने विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. त्याचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून आला.
तीनही मतदारसंघात झालेले मतदान (५ वाजेपर्यंत)
भंडारा: ६२.७८ टक्के
साकोली:६७.२१ टक्के
तुमसर: ६८.२७ टक्के
एकूण : ६५.८८ टक्के