भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची कॉर्नर सभा:कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
3 days ago
2
18 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील कोसंबी गावात 19 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री भाजप-महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांसोबत कॉर्नर सभा घेतली. या सभेची माहिती कॉंग्रेस उमेदवार संतोष रावत यांना मिळाली व तातडीने रावत त्यांच्या समर्थकांसोबत कोसंबी गावातील सभास्थळी पोहचले. संतोष रावत सभास्थळी पोहोचले तेव्हा कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, प्रचार संपल्यानंतर गावात सभा घेणे हे निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात आहे, असे रावत यावेळी म्हणाले. मात्र भाजप उमेदवार मुनगंटीवार म्हणाले की, मी या क्षेत्राचा आमदार आहे. गावातील समस्येबाबत बैठक घेत आहे, माझी बैठक संपली की आपण सुद्धा गावकऱ्यांशी चर्चा करा असे त्यांनी सांगितले. मात्र, हा आचारसंहितेचा भंग आहे म्हणत संतोष रावत यांनी सभा उधळून लावली, यावेळी रावत व मुनगंटीवार यांच्यात बाचाबाची झाली, काही कार्यकर्ते एकमेकांना सभेत भिडले. काही क्षणात पोलिस दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. रात्री उशिरापर्यंत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मूल पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. कॉंग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध कॉंग्रेसचे संतोष रावत अशी लढत आहे. मात्र ऐनवेळी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार चांगलेच अडचणीत आले असून अपक्ष उमेदवार दोघांनाही पाणी पाजणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)