भाजपचा नोट जिहाद! विनोद तावडे यांना पाच कोटी रुपये वाटताना रंगेहाथ पकडले, विरारच्या तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

1 day ago 2

मतदानाला अवघे वीस तास उरले असतानाच मतांच्या सौद्यासाठी कमळाबाईचा नोट जिहाद चव्हाट्यावर आला. भाजपचा ‘खेके बाटेंगे’कांडाचा तमाशा अख्ख्या जगाने पाहिला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना आज विरारच्या विवांता हॉटेलमध्ये पाच कोटी रुपयांचे वाटप करताना बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छापा टाकून रंगेहाथ पकडले. ही घटना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडेंच्या बॅगेतून पाचशे रुपयांची बंडले काढून मीडियासमोर ओतली आणि एकच खळबळ उडाली. हॉटेलमधील हायव्होल्टेज राडय़ानंतर दुपारी तीन वाजता तावडे आणि ठाकूर कार्यकर्त्यांसह बाहेर आले. दोघांनीही मीडियासमोर आपापली बाजू मांडली. या घटनेनंतर तुळींज पोलीस ठाण्यात विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने भाजपचे ‘तावडे’ लागल्याच्या प्रतिक्रिया अवघ्या महाराष्ट्रातून उमटल्या.  

 निवडणुकीला अवघे वीस तास उरले असतानाच विनोद तावडे आज विरार पूर्व येथील मनवेल पाडय़ातील विवांता हॉटेलात आले. तेथे भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि कार्यकर्तेही बसले. इतक्यात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडे ज्या खोलीत बसले होते तिथे धडक दिली आणि तावडेंच्या पुढय़ातील बॅग उघडून त्यातील पाचशे रुपयांच्या नोटांची बंडले बाहेर काढत तावडेंना जाब विचारला. याचा व्हिडीओ व्हायरल होताच बविआचे शेकडो कार्यकर्ते आणि मीडियाही तिथे मोठय़ा संख्येने पोहचला. त्यामुळे अवसान गळालेले तावडे आधी हॉटेल रूममध्ये असलेल्या किचनमध्ये जाऊन लपले. परंतु ही लपवाछपवी फार वेळ चालणार नाही हे लक्षात आल्यानंतर ते बाहेर खुर्चीवर येऊन बसले.

मतदान कसे वाढवायचे याचे मार्गदर्शन करायला आलो

मी निवडणुकीआधी मतदान कसे वाढवावे, मतदानाच्या दिवशी काय नियम असतात हे भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगायला इथे आलो होतो  अशी सारवासारव तावडे यांनी केली. मात्र तेथे पोहचलेले आमदार क्षितिज ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना अक्षरशः घेरले आणि तावडेंची बॅग उघडून त्यातून नोटांची बंडले बाहेर काढली. मीडियासमोर हा हायव्होल्टेज राडा सुरू होता. तावडेंच्या बॅगेत तब्बल पाच कोटी रुपये असल्याचा दावा आमदार क्षितीज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी केला.

तोपर्यंत तावडेंना इथून जाऊ देणार नाही

तावडे यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांना हॉटेलमधून हलू देणार नाही असा इशारा हितेंद्र ठाकूर यांनी दिला. परंतु पोलीस दोन तास मध्यस्थी करत होते. तावडेंना इथून जाऊ देणार का असे पत्रकारांनी विचारताच तावडे चुकीचे धंदे करताहेत, आम्ही चुकीचे धंदे करत नाही. पण तरीही तावडेंना सुखरूप घरी पोहचवू, मी कार्यकर्त्यांना समजावतो असे ठाकूर म्हणाले आणि नंतर त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर तब्बल साडेचार तासांनी तावडे हॉटेलच्या बाहेर आले.

तावडे म्हणतात, सीसी टीव्ही तपासा

मी वाडय़ाहून परतताना नालासोपाऱयात आलो. कार्यकर्त्यांच्या बैठकीत  त्यांना निवडणुकीच्या दिवशी काय नियम असतात ते सांगायला आलो.  इतक्यात हितेंद्र ठाकूर आले आणि त्यांनी माझ्यावर पैसे वाटपाचा आरोप केला. या प्रकरणाचे सीसी टीव्ही फुटेज तपासावे आणि निवडणूक आयोगाने चौकशी करावी असे विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निवडणूक आयोगाचे वरातीमागून घोडे

निवडणूक आयोगाचे अधिकारी विरोधी पक्षाच्या मोठय़ा नेत्यांची कार तपासतात, बॅगा तपासतात, हेलिकॉप्टर तपासतात. मग काही कोटींची रक्कम घेऊन आलेल्या तावडेंची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी का तपासली नाही असा संतप्त सवाल नालासोपारावासी करीत आहेत.  साडेचार तास राडा झाल्यानंतर माघारी निघालेल्या तावडेंची बॅग तपासण्याचा फार्स निवडणूक आयोगाने केला आणि तसा व्हिडीओही बनवला. निवडणूक आयोगाचा हा प्रकार म्हणजे वरातीमागून घोडे असाच असल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.

तावडे हॉटेलमध्ये आल्यापासून तिथले सीसी पॅमेरे बंद झाले. त्यामुळे या हॉटेलवरही कारवाई व्हायला हवी. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली.

या घटनेनंतर योग्य ती चौकशी करून कारवाई करू, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली. तर तावडेंना 23 नोव्हेंबरपर्यंत वसई, विरारमध्ये येण्यास बंदी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तावडेंच्या डायरीत दडलंय काय?

काही क्षणातच पोलीस आणि निवडणूक अधिकारीही घटनास्थळी पोहचले. त्यांच्यासमोर बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडेंच्या खोके वाटप  कारनाम्याचा पंचनामा केला. आमदार क्षितिज ठाकूर यांनी तावडे यांच्या बॅगेतील डायरी उघडून मीडियासमोर दाखवली. त्या डायरीत अनेकांची नावे व त्यांच्यासमोर रकमा लिहिल्या होत्या. एकूण किती पैसे वाटायचे याची टोटलही या डायरीत नोंदवली होती असे क्षितिज ठाकूर यांनी सांगितले. त्यात अश्विनी कांबळे 300 के, हिरू पांचाळ 300 के, प्राची भोंगळे 300 के, प्रतिक राठोड 300 के, अजय सिंग 500 के असा उल्लेख होता. याचा खुलासा करा याचा जाबही ठाकूर यांनी तावडे यांना विचारला. परंतु त्यावर तावडे यांना काहीही उत्तर देता आले नाही.

विनोद तावडेंना तत्काळ अटक करा काँग्रेसची मागणी

भारतीय जनता पक्ष आणि महायुती पराभवाच्या भीतीने मोठय़ा प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना नालासोपारामध्ये मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचे आरोप केले जात आहेत, त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली.

प्रत्येक मतदारसंघात आचारसंहितेआधी किमान 15 ते 20 कोटी पोहचलेत – संजय राऊत

भाजपने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी जे घडलं ते कॅमेऱयासमोर आहे. यामधून भाजपाचा खरा चेहरा समोर आला. विनोद तावडे हे पक्षाचे महासचिव असून त्यांच्याकडे 5 कोटी रुपये आढळून आले. या सगळ्या प्रकरणावर आता भाजपा काय खुलासा करणार? महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात किमान 15 ते 20 कोटी रुपये आचारसंहितेच्या आधी पोहोचले आहेत’, असा गंभीर आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई आणि ठाण्यातून पैसे वाटण्यासाठी खास माणसांच्या नेमणुका झाल्या आहेत. राम रेपाळे नावाच्या एका माणसासह माझ्याकडे 18 लोकांची नावे आहेत. विनोद तावडे हे स्वतः पैसे वाटतात हे आश्चर्य आहे. निवडणूक आयोगाचे लोक आमच्या बॅगा तपासतात.  जर भाजपा, शिंदे आणि अजित पवारांच्या लोकांमागे ससेमिरा लावला असता तर किमान महाराष्ट्राच्या तिजोरीत 1 हजार कोटी मिळाले असते, असे संजय राऊत म्हणाले.

तावडेंवर पाळत ठेवली गेली

‘विनोद तावडे यांच्याबाबतची माहिती राज्यातील भाजपाच्या प्रमुख नेत्याने हितेंद्र ठाकूर यांना दिली. तावडे हे भविष्यात आपल्याला जड होतील. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारस्थान झालं. ज्यांच्याकडे राज्याचं गृहखातं आहे, त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते. महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून तावडेंवर पाळत ठेवली गेली आणि ते पकडले जातील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला, असावा, असेही संजय राऊत म्हणाले.

विनोद देख भी रहा है और पैसे भी बाट रहा है

विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपानंतर काँग्रेसने यासंदर्भात एक्सवर व्हिडीओ प्रसिद्ध करून जोरदार टोला लगावला आहे. पंचायत या गाजलेल्या वेब सीरिजमधील देख रहा है विनोद… हा डायलॉग मारत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. सुरुवातीला पंचायतमधील पात्र देख रहा है विनोद असे म्हणते. त्यानंतर विनोद इस बार देख ही नही रहा है, विनोद इस बार पैसे भी बाट रहा है, भर भर कर पैसे बाट रहा है. एक थैली भरून पैसे घेऊन विनोद महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये गेला. पैसे वाटायला लागला. पकडले गेल्यावर पळ काढायला लागला, असा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

भाजपचे तावडे लागले बविआचे हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांचा कार्यकर्त्यांसह छापा

नोटांची बंडले फडकवली, वाटपाच्या नावांच्या नोंदी असलेली डायरीही झळकवली

‘चोर चोर भाजप चोर’च्या घोषणा देत बविआच्या कार्यकर्त्यांनी साडेचार तास कोंडले

आधी किचनमध्ये जाऊन लपले. नंतर म्हणाले, शप्पथ मी पैसे वाटले नाहीत. सॉरी सॉरी… मला जाऊ द्या… गर्भगळीत झालेल्या विनोद तावडेंच्या हात जोडून मिनतवाऱ्या

नऊ लाख दाखवले, पाच कोटी गेले कुठे?

विनोद तावडे यांनी मतदारसंघात पैशांचे वाटप करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये हॉटेलमध्ये आणल्याचा आरोप  हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. छापेमारीदरम्यान बविआच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या बॅगेतून आणि पिशव्यांमधून 500 रुपयांचे बंडलच्या बंडल बाहेर काढले. मात्र या सर्व प्रकरणानंतर फक्त नऊ लाख रुपयेच असल्याचे दाखवले गेले. त्यामुळे तावडे यांनी आणलेले पाच कोटी गेले कुठे, असा सवाल करत ठाकूर यांनी चौकशीची मागणी केली.

मोदीजी, हे 5 कोटी कोणाच्या ‘सेफ’मधून आले

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, हे 5 कोटी रुपये कोणाच्या तिजोरीतून बाहेर आले? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला टेम्पोमध्ये कोणी पाठवला?असा सवाल लोकसभेतील विरोधीत पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे.

भाजपच्या बडय़ा नेत्यानेच टीप दिली

विनोद तावडे काही कोटी रुपये घेऊन नालासोपाऱयात वाटायला येत आहेत अशी टीप मला भाजपच्या एका बडय़ा नेत्यानेच दिल्याचा भंडापह्ड  आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. मला वाटलं तावडेंसारखा राष्ट्रीय स्तरावरील नेता अशा लहान-सहान गोष्टी करणार नाही. पण आमचे कार्यकर्ते जेव्हा हॉटेलवर पोहोचले तेव्हा त्यांना तावडे आणि नोटांची बंडले दोन्ही सापडले.   कार्यकर्त्यांनी जेव्हा तावडेंना नोटांसह रंगेहाथ पकडले तेव्हा त्यांनी मला तब्बल 25 वेळा पह्न करून माफी मागितली. प्रकरण जास्त ताणू नका, मला सोडवा, माझी चूक झाली अशी विनंती तावडे यांनी केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

पैसे वाटताना मिंध्यांच्या तालुकाध्यक्षाला बविआ कार्यकर्त्यांनी धू धू धुतले

विनोद तावडे यांच्याबरोबर विवांता हॉटेलमध्ये मिंधे गटाचा तालुकाध्यक्ष सुदेश चौधरी याला बविआ कार्यकर्त्यांनी धू धू धुतले. तावडे यांना त्यांच्या खोलीत घेराव घातला असतानाच तळमजल्यावर चौधरी हा पैशांचे पुडके वाटत असतानाच रंगेहाथ पकडला गेला. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत हा खोके वाटपाचा कार्यक्रमच उधळून लावला. तसेच सुदेश चौधरी याला चांगलाच चोप देत अद्दल घडवली. याप्रकरणी क्षितीज ठाकूर यांच्यासह पाच ते सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article