Published on
:
24 Nov 2024, 1:22 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:22 am
कोल्हापूर : जिल्ह्यातील दहापैकी दहाही जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठीची चुरस वाढली आहे. मावळत्या सरकारमध्ये हसन मुश्रीफ हे पालकमंत्री राहिले आहेत. हसन मुश्रीफ यांच्यासह जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे, शिंदे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, शिंदे समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, भाजपचे अमल महाडिक व राहुल आवाडे हे मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असतील.
अजित पवार राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ हे जिल्ह्यातून निवडून आलेले एकमेव आमदार असून, त्यांचा मंत्रिपदासाठी जोरदार दावा असेल. तसेच अपारंपरिक ऊर्जामंत्री राहिलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे तसेच तिसर्यांदा विधानसभेत प्रवेश करणारे शिंदे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके हे प्रबळ दावेदार असतील. क्षीरसागर सध्या राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत; तर भाजपकडून दुसर्यांदा निवडून आलेले अमल महाडिक, तर पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करणारे राहुल आवाडे तसेच अपक्ष म्हणून निवडून आलेले व महाविकास आघाडीत आरोग्य राज्यमंत्री राहिलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटाकडून प्रबळ दावेदार असतील.
‘पालकमंत्री’ पदासाठी रस्सीखेच
कोल्हापूरचे पालकमंत्रिपद कोणाकडे, याबाबत महायुती सरकारमध्ये जोरदार रस्सीखेच असेल. शिंदे शिवसेनेला जिल्ह्यात सर्वाधिक तीन आमदार असून तिघेही तिसर्या वेळी निवडून आले आहेत. तर भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात भक्कमपणे पाय रोवायचे असल्याने भाजप आपला दावा सोडणार नाही. राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिपदासाठीचे दावेदार असलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे हे जिल्ह्यातून दोन आमदार निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असतील.