Published on
:
25 Nov 2024, 5:01 am
Updated on
:
25 Nov 2024, 5:01 am
अलिबाग | रायगडमध्ये महायुतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादित केल्यावर आता सर्वानाच उत्सुकता लागली आहे ती नव्या मंत्रिमंडळात रायगडचे कोण कोण असणार. सातही आमदार हे पुन्हा निवडूण आलेले असल्याने सर्वांनाच संभाव्य मंत्रिमंडळात आपण असावे अशी इच्छा असल्याने ते सुद्धा पाण्यात देव ठेऊन बसले आहेत.
रायगडमधून शिवसेना ( शिंदे) गटाचे भरत गोगावले,महेंद्र दळवी,महेंद्र थोरवे,भाजपचे प्रशांत ठाकूर,रवी पाटील,महेश बालदी आणि राष्ट्रवादी( अप) आदिती तटकरे विजयी झालेले आहेत.यामध्ये आदिती तटकरे या विद्यमान मंत्रिमंडळात महिला,बालकल्याण खात्याच्या मंत्री आहेत.त्यांच्याच खात्यामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली.शिवाय आदिती यांनीही उत्तमरित्या ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवलीही. त्या राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत.त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा मंत्रीपदावर दावा असणार आहे.
दुसरे प्रबळ दावेदार आहेत ते महाडचे आ.भरत गोगावले.अडीच वर्षापासून त्यांना मंत्रिपदाची हुलकावणी दिली आहे. मंत्रिपद मिळत नसल्याने अखेरच्या टप्प्यात त्यांना एसटी महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले. पण कॅबिनेट मंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न पुन्हा उफाळून आले आहे. यामुळे त्यांचा पहिल्याच टप्प्यात मंत्री म्हणून शपथविधी होतो का हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. गोगावले यांच्यासह अलिबागचे महेंद्र दळवी यांनीही आपण मंत्रीपदासाठी उत्सुक असल्याचे जाहीर केले आहे. शेकापला शह देण्यासाठी त्यांना मंत्री केल्यास त्याचा राजकीय फायदा भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता गोगावले की दळवी याबाबत कुणाला संधी दिली जाते. याकडे रायगडचे लक्ष लागलेले आहे. महेंद्र थोरवे यांनाही एखादे महामंडळ दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र उपलब्ध माहितीनुसार महायुतीतील घटक पक्षांच्या वाट्याला मंत्रिपदाच्या किती जागा येतात याबाबत दिल्ली स्तरावर चर्चा सुरू आहे.आधी सरकार स्थापन करताना कुणा कुणाचा शपथविधी होतो.त्यात कुणा कुणाचा समावेश होतो याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे.त्याचवेळी याचा उलगडा होईल.मग त्यानंतर संभाव्य विस्ताराचा मुद्दा चर्चिला जाईल.
रवी पाटील की प्रशांत ठाकूर
रायगडमधून भाजपचे तीन आमदार विजयी झालेले आहेत.यामध्ये रवी पाटील आणि महेश बालदी हे भाजपतर्फे सलग दुसर्यांदा,तर प्रशांत ठाकूर हे सलग तिस़र्यांदा विजयी झालेले आहेत.रवी पाटील,प्रशांत ठाकूर हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.रवी पाटील हे काँग्रेसमध्ये असताना मंत्री झालेले आहेत.तर प्रशांत ठाकूर हे फडणवीस सरकारच्या काळात काहीकाळ सिडकोचे अध्यक्षपद भूषविलेले आहे.शिंदे,फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात त्यांच्या नावाची विस्ताराच्या वेळी चर्चा सुरु व्हायची पण त्यांचा समावेश मात्र झालाच नाही.यामुळे ते सुद्धा आता मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.महेश बालदी यांचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्याशी जवळकीचे संबंध आहेत.शिवाय ते मुळचे संघ परिवाराशी निगडीत आहेत.यामुळे कदाचित त्यांनाही मंत्री अथा एखादे महामंडळ मिळू शकते.