सातारा : पोवई नाका येथे ना. शंभूराज देसाई यांचे जल्लोषी स्वागत केले.Pudhari Photo
Published on
:
24 Jan 2025, 11:30 pm
Updated on
:
24 Jan 2025, 11:30 pm
सातारा : सातारच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ना. शंभूराज देसाई यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले. हार-तुरे, फटाक्यांची आतषबाजी, डॉल्बीच्या दणदणाटात आगमन झाल्याने ना. शंभूराज देसाई यांचा जलवा पाहायला मिळाला. दरम्यान, सातारा जिल्ह्याचा सलग दुसर्यांदा पालकमंत्री होण्याचा बहुमान मिळाला, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, अशी भावूक प्रतिक्रिया ना. शंभूराज देसाई यांनी सातार्यात व्यक्त केली. दरम्यान, पोवईनाक्यावरील कोयना दौलत निवासस्थानासमोर त्यांची पेढेतुला करण्यात आली.
नुकत्याच राज्यातील पालकमंत्री पदाच्या निवडी जाहीर झाल्या. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाई यांची निवड झाल्यानंतर शुक्रवारी प्रथमच ते सातार्यात आले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गावर आगमन झाल्यानंतर त्यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. जिल्ह्यावासीयांनी औक्षण करुन त्यांचे अभिनंदन केले. महामार्गावरुन सातारा शहरात येत असताना शहरवासीयांनीही त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
पोवई नाका येथे साडेसहा वाजता ना. शंभूराज देसाई दाखल झाले. यावेळी त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, स्व. यशवंतराव चव्हाण, स्व.बाळासाहेब देसाई यांना अभिवादन करण्यात आले. पोवई नाक्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.‘पालकमंत्री शंभूराज देसाई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
पोवई नाक्यावरुन ना.शंभूराज देसाई त्यांच्या दौलत या निवासस्थानाबाहेर आल्यानंतर तर अनोखा माहोल पहायला मिळाला. याठिकाणी युवा सेनेच्यावतीने त्यांची पेढ्याची तुला करण्यात आली. पेढ्याची तुला झाल्यानंतर ना.शंभूराज देसाई कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, सातारा जिल्ह्याचा दुसर्यांदा पालकमंत्री होण्याचा बहुमान मिळाला ही आपल्यासाठी भाग्याची बाब आहे. जिल्ह्याचा रुतबा, जिल्ह्याची शान कायम अबाधित राहील. विकासकामांमध्ये जिल्ह्याची कुठेही पिछेहाट होणार नाही. महायुती पक्षातील सर्वांना सोबत घेवून पुढे वाटचाल करणार आहे. जिल्ह्यातील सर्व मंत्री व आमदार यांना सोबत घेवून जिल्ह्याचा विकास साधणार. यावेळी सातार्यातील नागरिक, शिवसेना, युवासेनाचे पदाधिकारी, पाटण येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.