महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. या मतदानात निवडणूक कर्मचाऱ्यांनी अतिशय मोलाची भूमिका निभावली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी मतदार केंद्रांवर ज्याप्रकारे संथगतीने काम अनेक ठिकाणी बघायला मिळाली होती, तशी तक्रार या मतदानावेळी आढळली नाही. फार क्वचित ठिकाणी मतदान केंद्रावर काही काळासाठी मतदान थांबवण्यात आलं, अशी घटना घडली. या सगळ्या गोष्टीचं श्रेय हे प्रशासन आणि त्या प्रशासनात असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना जातं. अनेक कर्मचारी मतदानाचं कार्य आटोपून रात्री उशिरा आपापल्या घरी गेले. पण या दरम्यान काही ठिकाणी अनपेक्षित घटना घडल्या. महाराष्ट्रातील जळगाव आणि साताऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन निवडणूक कर्मचाऱ्यांचा रात्री उशिरा घरी परतत असताना दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगावातील चोपडा येथून निवडणूक प्रक्रिया आटोपून परतणारे बीएलओ यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. लक्ष्मीकांत पाटील (४८) असे या ठार झालेल्या बीएलओचे नाव आहे. ते चोपडा तालुक्यात अनवर्दे खुर्द येथे शिक्षक आणि बीएलओ म्हणून कार्यरत होते. रात्री ते चोपडा येथून शिरपूर तालुक्यातील बभळाज या मूळ गावी दुचाकीने जाता होते. त्याचवेळी समोरून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
निवडणुकीची प्रक्रिया आटोपून घरी परतणारे बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) दुचाकी अपघातात ठार झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडली. संबंधित घटना ही बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत बीएलओ लक्ष्मीकांत पाटील यांचा मृत्यू झाला. ते अनवर्दे खुर्द येथे शिक्षक आणि बीएलओ म्हणून कार्यरत होते. बुधवारी रात्री ते चोपडा येथून बभळाज, ता शिरपूर या मूळ गावी दुचाकीने जाता होते. त्याचवेळी समोरून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात ते ठार झाले. त्यांच्या मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज बभळाज येथून निघणार आहे.
साताऱ्यातही महसूल अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू
साताऱ्यातही अशीच एक घटना घडली. दिवसभर निवडणुकीचं काम केल्यानंतर निवडणुकीचे काम संपवून घरी जाताना महसूल अधिकाऱ्याचा अपघात झाला. या अपघातात अधिकारी रोहित कदम यांचा जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची घटना रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. त्यांची मोटरसायकल ऊसाच्या ट्रॉलीला धडकल्याने ही अपघाताची घटना घडली. रोहित कदम हे जावलीतील आनेवाडी गावात कर्तव्यावर होते. ते मोटरसायकलवरून घरी जाताना महामार्गावरील उडतारे येथे त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रोहित हे भुईंज गावचे सुपुत्र होते.