राज्यात घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आलेल्या मिंधे-भाजप सरकारने लाडका कंत्राटदार आणि लाडक्या उद्योगपतींचे हित जोपासण्याचे काम केले. वाढती महागाई, बेरोजगारी, उद्योग राज्याबाहेर पळवणाऱयांना मदत करून महाराष्ट्रातील जनतेला देशोधडीला लावणाऱया महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनजागृती केली. त्यास राज्यातील जनतेने प्रतिसाद देत भरभरून मतदान केले. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोटय़वधी मतदारांनी दिलेला हा काwल मतपेटीतून उद्या उघडला जाईल. 288 जागांचे निवडणूक निकाल जाहीर होऊन महाराष्ट्राच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. राज्यातील जनतेसह संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. मतदानाचा पहिला कल सकाळी 9 वाजेपर्यंत येणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रात लोकशाही पद्धती पायदळी तुडवत होडाफोडीचे राजकारण करून अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या मिंधे सरकारच्या राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला असून महाराष्ट्राचे अदानीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबई आणि राज्यावर घोंगावणारे अदानी संकट रोखण्यासाठी व मुलाबाळांचे कल्याण, महिलांची सुरक्षा, तरुणांच्या हाताला काम यासाठी राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान करत आपला हक्क बजावला. मिंधे-भाजप महायुती सरकारच्या हुकूमशाही राजवटीविरुद्धचा संताप व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सरासरी टक्क्यांनी मतदान वाढल्याने सत्ताधारी महायुतीच्या तंबूत घबराट पसरली असून मातब्बर नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
मतदानाचा टक्का वाढल्याने महायुतीत धाकधूक
विधानसभा निवडणुकीत गेल्या 30 वर्षांमधील मतदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. लोकसभा निवडणुकीत तब्बल 61 टक्के मतदान झाले होते, परंतु विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. अंतिम आकडेवारीनुसार यंदा राज्यभरात सरासरी 66.05 टक्के मतदान झाले. हे वाढलेले मतदान कोणासाठी फायदेशीर ठरणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
एखाद्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्यास तो प्रस्थापित सत्ताधारी पक्षविरोधी कल मानला जातो. यामुळे महायुतीच्या गोटात मोठी धाकधूक आहे. अनेक बडय़ा नेत्यांच्या मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूरच्या कागल मतदारसंघात झाले. या ठिकाणी तब्बल 81 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अशी आहे मतमोजणीची व्यवस्था
288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी केंद्रे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 1 मतमोजणी केंद्र असेल.
288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी निरीक्षक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 2 निरीक्षक नियुक्त.
सकाळी 8 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीस प्रारंभ.
पोस्टल बॅलेट्सच्या मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर 8ः30 वाजता ईव्हीएमवर झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू होईल.
मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सीसीटीव्हीने कव्हर केली जाणार. सर्व मतमोजणी केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तीन स्तरांचे सुरक्षा कवच असेल.
सर्व विधानसभा मतदासंघांमध्ये पोस्टल बॅलेट्सची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे 288 मतमोजणी केंद्रांवर पोस्टल बॅलेट्ससाठी 1,732 टेबल्स आणि ETPBS स्पॅनिंगसाठी 592 टेबल्सची (पूर्व-मतमोजणीसाठी) व्यवस्था करण्यात आली आहे.