महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग:तिसऱ्या आघाडीचा बडा चेहरा CM एकनाथ शिंदेंच्या भेटीला, तासाभराच्या बैठकीत राजकीय खलबते

3 days ago 2
विधानसभा निवडणउकीच्या तारखांची घोषणा होण्यास अवघ्या एका तासाचा अवधी शिल्लक असताना तिसऱ्या आघाडीचे नेते तथा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांत जवळपास तासभर चर्चा झाली. त्यात शिंदे यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडलेल्या बच्चू कडू यांना पुन्हा सोबत घेण्यासाठी त्यांची समजूत काढल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दुपारी 3.30 ला पत्रकार परिषद घेणार आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घडामोडींना वेग आला आहे. परिवर्तन महाशक्ती अर्थात तिसऱ्या आघाडीचे प्रमुख नेते बच्चू कडू मंगळवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. याठिकाणी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते संजय शिरसाट, आनंदराव अडसूळ व प्रताप सरनाईक उपस्थित आहेत. त्यात बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. गत महिन्यात स्थापन केली होती तिसरी आघाडी उल्लेखनीय बाब म्हणजे बच्चू कडू यांनी गेल्याच महिन्यात राजू शेट्टी, युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मदतीने परिवर्तन महाशक्तीची घोषणा केली होती. तिसऱ्या आघाडीच्या रुपात आपण मतदारांना पर्याय देणार असल्याचे त्यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात सांगितले होते. बच्चू कडू यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. पण त्यानंतर 2022 मध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. या बंडाला शिवसेनेच्या 40 आमदारांसह काही अपक्षांनी साथ दिली. बच्चू कडूंच्या प्रहारनेही शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या सरकारमध्ये कडू यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यांना केवळ दिव्यांग कल्याण मंडळाची जबाबदारी दिली गेली. यामुळे बच्चू कडू शिवसेनेवर नाराज आहेत. या नाराजीतूनच बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या रुपात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजकुमार पटेल प्रहारला सोडचिठ्ठी देणार? दुसरीकडे, प्रहार संघटनेचे आमदार राजकुमार पटेल यांनी बच्चू कडू यांना सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिलेत. त्यांच्या पोस्टरवरुन कडूंचा फोटोही गायब झाला आहे. कडूंच्या फोटोच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो दिसून येत आहे. त्यामुळे राजकुमार पटेल लवकरच शिवसेनेत दिसतील असा अंदाज आहे. यामुळेही बच्चू कडूंचा शिवसेनेवरील रोष वाढल्याची चर्चा आहे. त्यातच निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याच्या ऐन तोंडावर कडू यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात बच्चू कडू नेमकी कोणती भूमिका घेणार? काही वेगळा निर्णय घेणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article