Published on
:
17 Nov 2024, 5:58 am
Updated on
:
17 Nov 2024, 5:58 am
नाशिक : विकासाचे प्रकल्प रद्द करणाऱ्या काँग्रेस व मित्रपक्षांची महाविकास नव्हे, तर 'महाविनाश' आघाडी असल्याचा घणाघाती आरोप करत फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या महाविकास आघाडीला या निवडणुकीत जनता धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. १६) ठाकूर नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजपच्या उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकूर यांनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठविताना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. एके काळी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींना चपलांनी मारू असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. मात्र पुत्रमोह, सत्तामोह यापायी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा आधार घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास करणाऱ्या महायुतीला जनता निवडून देईल. नाशिकमध्ये गुंडगिरी, खंडणीखोरी करणाऱ्या उमेदवारांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिले असून, त्यांनी काल भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केला. अशा उमेदवारांना मतदार जागा दाखवतील, असे ठाकूर यांनी सांगितले.
महाआघाडीचे इरादे नेक नाहीत. काँग्रेसने कायम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. काँग्रेसने ३७० कलमाद्वारे काश्मीरला वेगळा दर्जा देऊन तेथे डॉ. आंबेडकर यांचे संविधान लागू केले नव्हते. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ती उणीव भरून काढली. नाशिकचा एचएएल कारखाना बंद पडेल असे भाकीत राहुल गांधींनी केले होते. प्रत्यक्षात तेथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू असून, डिफेन्स कॉरिडोर तयार झाला आहे. भारतातील युद्ध साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जात आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद यांचा उल्लेख करून काँग्रेस फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करून भयमुक्त देश, भयमुक्त राज्य व भयमुक्त नाशिकसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
मेट्रो निओ प्रकल्प सुरू करणार
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास झाला. मुंबईमध्ये मेट्रो तसेच अनेक सुधारणा त्यांनी केल्या. नाशिकमध्ये आयटी हब आणण्याचे काम आम्ही करणार असून, नाशिक मुंबई, पुणे ट्रँगलचा विकास करण्याचे स्वप्न आहे. सिंहस्थापूर्वी मेट्रो निओ प्रकल्पदेखील सुरू करण्यात येईल, असेही ठाकूर यांनी सांगितले.