महिला चोरांची टोळीpudhari
Published on
:
16 Nov 2024, 6:04 am
Updated on
:
16 Nov 2024, 6:04 am
शहरातील कापड दुकाने व एसटी बसमध्ये महिलांचे दागिने चोरून पसार होणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली. ही टोळी छत्रपती संभाजीनगर येथून रिक्षाने अहिल्यानगर येथे येऊन एसटी बस व कापड दुकानांत चोरी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून एक लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले.
इंदाबाई ऊर्फ इंदुबाई दिलीप ढोकळे (वय 60, रा. छत्रपती संभाजीनगर), नीलाबाई बाबू शिंदे (वय 50), फुलाबाई भानुदास ढोकळे (वय 60, दोघी रा. जालना), ज्ञानेश्वर शिवलाल चव्हाण (वय 45, रा. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता फिर्यादी वंदना किशोर जाधव (रा. अहिल्यानगर) जालना ते अहिल्यानगर एसटी बसने प्रवास करीत होत्या. बस, हॉटेल धनश्री, माळीचिंचोरा, ता. नेवासा येथे जेवणासाठी थांबलेली असताना फिर्यादीच्या बॅगेतून एक लाख 56 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले.
नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार संदीप पवार, संतोष लोढे, संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे व उमाकांत गावडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यात तीन महिलांसह चौघांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. ते रिक्षाने अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 68 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यात 25 हजारांच्या नवीन साड्या, 13 हजार 500 रुपयांचे नवीन शर्ट, दोन मोबाईल, रिक्षा यांचा समावेश आहे.
आरोपींनी दिलेल्या माहितीवरून नेवासा पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच, अहिल्यानगर शहरामध्ये चोरी केल्याच्या सांगितलेल्या घटनेबाबत पुढील कारवाई करण्यात येत आहे. आरोपींना तपासाकामी नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बसमधून दागिने चोरीत हातखंडा
तपास पथकाने वरील आरोपींना विश्वासात घेऊन, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता आरोपी इंदाबाई ढोकळे हिने नवीन साड्या, शर्ट व मोबाईल हे अहिल्यानगर शहरातील कपड्याच्या दुकानांमधून चोरल्याची माहिती सांगितली. यापूर्वी 6 ते 7 दिवसांपूर्वी रिक्षामधून येऊन हॉटेल धनश्री, नेवासा येथे जेवणाकरिता थांबलेल्या एसटी बसमधील एका बॅगमधील सोन्याचे दागिने व भेंडा येथील एका कपड्याचे दुकानामधून साड्या चोरल्याचे सांगितले.