Aircel Maxis case | माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरोधातील एअरसेल-मॅक्सिस खटल्याला स्थगितीPudhari Photo
Published on
:
20 Nov 2024, 12:23 pm
Updated on
:
20 Nov 2024, 12:23 pm
नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी एअरसेल-मॅक्सिस प्रकरणाशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्धच्या कारवाईला स्थगिती दिली. न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांनी चिदंबरम यांच्यावरील कारवाई पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणात न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली आहे. यासंबंधीचे तपशीलवार आदेश देणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.
पी. चिदंबरम यांनी एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात त्यांच्या आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना एअरसेल-मॅक्सिसला देण्यात आलेल्या परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या मंजुरीमधील कथित अनियमिततेशी संबंधित आहे. सीबीआय आणि ईडीने जुलै २०१८ मध्ये संबंधित आरोपपत्र आणि तक्रारी दाखल केल्या आहेत.