कोपरी-पाचपाखाडीतील शिवसेना उमेदवार केदार दिघे हे रात्री मतदारसंघात फिरत असताना त्यांची गाडी पोलिसांनी व निवडणूक यंत्रणेने तपासली. दिघे यांनी त्यांना सगळे ‘क्लिअर’ आहे का असे विचारले तेव्हा त्यांनी हो म्हटले. मात्र त्यानंतर चक्रे फिरली आणि केदार दिघे यांच्या गाडीत दारू आणि पैसे सापडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. माझी गाडी तपासली तेव्हा सगळे क्लिअर होते, मग नंतर माझ्या गाडीत पैसे आणि दारू सापडल्याचा गुन्हा कसा काय दाखल झाला? निवडणूक आणि पोलीस यंत्रणा मिंध्यांच्या दावणीला बांधली गेली आहे. माझे आडनाव दिघे आहे, कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही असे केदार दिघे यांनी ठणकावून सांगितले.
बुधवारी मध्यरात्री केदार दिघे कोपरीतील अष्टविनायक चौकात त्यांच्या गाडीतून गेले होते. यावेळी पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी गाडी अडवली तेव्हा दिघे यांनी गाडी पोलीस ठाण्यात नेऊन तपासण्यास सांगितले. तपासणीनंतर दिघे यांनी सगळे क्लिअर आहे का असे विचारले. त्यावर होकार देत अधिकाऱ्यांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली. मात्र नंतर अचानक त्यांच्या गाडीत दारू आणि पैशांची पाकिटे सापडल्याचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. यानंतर केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला.
माझी गाडी चेक करतानाचा व्हिडिओ मी जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करत आहे. त्यात काही सापडले नाही. हा मला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून मी स्वतःहून पोलीस स्टेशनला माझी गाडी घेऊन गेलो होतो, त्यानंतर जे काही घडत आहे ते राजकीय हेतूने प्रेरित आहे. @aajtak @republic pic.twitter.com/fe428j6kdP
— Kedar Dighe (@MiKedarDighe) November 20, 2024
सत्ताधारी घाबरले; आता माझा बळी देताय का?
हे राजकीय षड्यंत्र आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. सत्ताधारी घाबरले असून मी माझी गाडी स्वतःहून पोलीस ठाण्यात नेली. गाडीची पूर्ण तपासणी केल्यानंतर त्यात काहीही सापडले नाही. मात्र जाणीवपूर्वक सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये मला बदनाम करण्याचा हेतू आहे. कोपरी-पाचपाखाडीत पैशांचा महापूर आणणाऱ्या आणि साडीवाटप करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांच्याकडून आचारसंहितेचे पालनच केले जात नाही. त्याचा बळी मला करत आहात का? असा संतप्त सवाल केदार दिघे यांनी व्यक्त केला.