माढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांची गर्दी:देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय पोहोचले शरद पवार गटाच्या मुलाखतीला

2 hours ago 1
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांच्या देखील पक्षाकडून मुलाखती घेतल्या जात आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणारे अभिजीत पाटील हे देखील मुलाखतीसाठी शरद पवार गटाकडे गेल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अभिजीत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. अभिजीत पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले होते. मात्र, आता त्यांनी शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीला आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे मात्र उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे रणजीत शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असूनही त्यांनी मुलाखतीस उपस्थिती दर्शवली नसल्याने चर्चा सुरू आहे. तसेच मोहिते पाटील यांच्याकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, मात्र ते देखील मुलाखतीला आले नव्हते. दरम्यान, अभिजीत पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. लोकसभा प्रचारावेळी त्यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी अखेरच्या दोन दिवसात शरद पवार गट सोडत थेट भाजपचा प्रचार सुरू केला. त्यानंतर त्यांच्या कारखान्यावरील जप्ती उठवण्यात आली होती. याचसोबत कर्जात अडकलेल्या कारखान्याला मोठे पॅकेज देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे बोलले जात आहे. पुण्याच्या निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून विविध मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. यात माढा विधानसभा मतदारसंघातून संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, संजय पाटील घाणेकर, बाळासाहेब पाटील, नितीन कापसे व इतर अशा जवळपास दहा जणांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यात अभिजीत पाटील यांचा देखील समावेश आहे. आमदार बबन शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी देखील मुलाखत दिली असल्याचे समजते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article