माण -खटाव विधानसभा मतदारसंघातील विविध केंद्रांवर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले.Pudhari Photo
Published on
:
21 Nov 2024, 2:25 am
Updated on
:
21 Nov 2024, 2:25 am
दहिवडी : माण-खटाव विधानसभा मतदारसंघात बुधवारी सर्वत्र उत्साहात व शांततेत सुमारे 71 टक्के मतदान झाले. 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आ. जयकुमार गोरे चौकार मारणार की प्रभाकर घार्गे यांचे नशीब चमकणार याबाबत जनतेत कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान आठ ठिकाणी मतदानाची वेळ संपली तरी मतदानासाठी रांगा होत्या. तीन ठिकाणी मतदान सुरू असताना मशीन बंद पडल्याने तत्काळ मशीन बदलून मतदान सुरू करण्यात आले. गेल्यावेळेपेक्षा 10 टक्के मतदान वाढले असून त्याचा फायदा कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी सकाळी थंडी असल्याने पहिल्या दोन तासात 4 टक्के पेक्षा कमी मतदान झाले. नऊनंतर मात्र मतदानाने थोडा वेग घेतला. सकाळी अकरा वाजेपर्यंत 15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 1 वाजेपर्यंत जवळपास 30 टक्के मतदान झाले. एक वाजेपर्यंत 1 लाख 7 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 58 हजार पुरुष तर 49 हजार महिलांनी मतदान केले. दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग आणखी वाढत गेला. दुपारी 3 वाजेपर्यंत 45 टक्के मतदान होऊन 1 लाख 62 हजार 700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत या दोन तासात 15 टक्के मतदान झाले. 5 वाजेपर्यंत 60.69 टक्के मतदान झाले होते. तोपर्यंत 2 लाख 18 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये 1 लाख 9हजार 851 पुरुष व 1 लाख 9 हजार महिलांचा समावेश होता. शेवटच्या एक तासात 6 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी रांगा लावून मतदारांनी मतदान केले.
मशिन बंद पडल्याने काही वेळ व्यत्यय
माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील पळशी, गोंदवले खुर्द, धुळदेव, मार्डी, भालवडी, भोसरे, वडजल, नढवल, या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजल्यानंतरही मतदारांच्या रांगा होत्या. शेवटचा एक तास अत्यंत चुरशीने मतदान झाले. सहा वाजले तरी मतदारांच्या केंद्रावर रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. मतदारसंघातील वडूज, धुळदेव, उंबर्डे येथील मशीनमध्ये किरकोळ बिघाड झाला. परंतु तातडीने मशीन बदलल्याने मतदानावर परिणाम झाला नाही. दोन ते तीन गावात किरकोळ बाचाबाचीच्या घटना वगळता पूर्ण मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी दिली.