मास्तर हे वागणं बरं नव्हं:पांढरी टोपी का नाही घातली म्हणून विद्यार्थ्यांना बदडले , शिक्षकाने दारू पिऊन भांडणे करीत विद्यार्थ्यांवर राग काढला
3 hours ago
2
हिंगणघाट पंचायत समितीअंतर्गत असलेली बोपापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शिक्षकांच्या भांडणांमुळे चर्चेत आली आहे. यातील एका शिक्षकाने एकमेकांवरचा राग चक्क तीन विद्यार्थ्यांवर काढला आणि पांढरी टोपी का नाही घातली म्हणून त्यांना बेदम मारहाण केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. दरम्यान, संबंधित शिक्षक मद्यप्राशन करून असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून कारवाई केली जाणार असे सांगितले जात आहे. हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा असून त्या शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. तेथील सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक धनपाल राऊत, प्रभाकर वाळके, बादल धाबर्डे व एक असे चार शिक्षक शिकवत असतात. येथील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपसामध्ये वाद निर्माण करतात आणि त्या वादाचे रूपात भांडणांमध्ये होत असल्याचे चित्र ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ९ जानेवारी रोजी तत्काळ शिक्षकांची बदली करण्यात यावी, अशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. तोच प्रकार २९ जानेवारी रोजी घडला आणि तो राग प्रभाकर वाळके या शिक्षकाने चक्क एका विद्यार्थ्यावर काढला. पांढरी टोपी का परिधान केली नाही असे बोलून एका विद्यार्थ्याच्या हातावर पाय देऊन बेदम मारहाण केली, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला बेंचवर उभा करत मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. शिक्षक अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करत असतील तर विद्यार्थी शाळेत कसे जाणार, असा प्रश्न पालकांमध्ये उपस्थित केला जात आहेत. मुख्याध्यापकांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. दरम्यान, पालकांनी जाब विचारल्यानंतर संबंधित शिक्षकाने दारू प्राशन केल्याचे समोर आले आहे. वाळके म्हणाला, मला माफ करा याबाबत काही विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर काही पालकांनी थेट शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाला जाब विचारला असता तो पालकांच्या पाया पडू लागला. मला माफ करा. यानंतर असा प्रकार होणार नाही. मात्र, पालकांनी त्याला वयाचा मान राखून सोडून देत असल्याचे या वेळी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अंगावर टेबल पाडला मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना पालकांनी विचारणा केली असता एका विद्यार्थ्याने सांगितले की, वाळके सरांनी हातावर लाथ मारली. तसेच पांढरी टोपी का घालत नाही असे विचारत पुन्हा मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या अंगावर टेबल पाडून त्यालाही मारहाण केली.त्यामुळे पालक संतप्त झाले होते. त्या दोन शिक्षकांवर योग्य कारवाई केली जाणार बोपापूर येथील शाळेमध्ये दोन शिक्षकांमध्ये आपसात वाद होत होता. त्या वादाचा राग ते दोन शिक्षक विद्यार्थ्यांवर काढत होते. याप्रकरणी केंद्रप्रमुखांना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोन शिक्षकांवर योग्य कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल लवकरच येणार आहे. -नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी, वर्धा
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)