शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ येते तेव्हा यांच्याकडे पैसे नसतात, पण जेव्हा कंत्राटदारांना पैसे द्यायची वेळ येते तेव्हा यांच्याकडे पैसे असतात अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच मिंधेच्या नगरविकास विभागात 74 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आज आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, या गद्दारांनी गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही केली, ना उद्धव ठाकरे यांच्याशी ना शरद पवारांशी, या गद्दारांनी संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. एका बाजूला लूट सुरू आहे, मग तो रस्ता घोटाळा असो, वेडिंग मशीन, वेताळ टेकडीचा त्यांना नाश करायचा आहे, पुण्यातल नदी विकास प्रकल्प असेल. दुसरीकडे महिलांवर अन्याय आणि अत्याचार वाढले आहेत. राज्यात महाराष्ट्रांचेही नुकसान झाले आहे, दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्यावरही शेतकऱ्यांना एकनाथ शिंदे सरकारने मदत केली नाही. हे सरकार ना शेतकऱ्यांचे आहे ना महिलांचे ना युवांचे, हे सरकार फक्त कंत्राटदारांचे. या सरकारचे मालक जरी अदानी असले तरी यांचे आवडते कोन्ट्रॅक्टर आवडते बिल्डर यांचे सरकार आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत सांगितले आहे की महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर धारावीकरांना हक्काचे घर देऊ आणि अदानीला दिलेले कंत्राट रद्द करू. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना क्लस्टरच्या नावाखाली जी गावठाणं खायची आहेत ते आम्ही होऊ देणार नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ येते तेव्हा यांच्याकडे पैसे नसतात, पण जेव्हा कंत्राटदारांना पैसे द्यायची वेळ येते तेव्हा यांच्याकडे पैसे असतात. नगरविकास खात्यात घोटाळा झाला आहे. हे खातं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित येतं. मुंबई आणि प्रदेशात मेट्रोची कामं सुरू आहेत. अनेक ठिकाणी ही कामं पूर्ण झालेली नाहीत. कामं पूर्ण झाली नसताना त्यांची पिलर्स रंगवली आहेत. जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा पुन्हा यांना रंग दिला जाईल. ही रंगरंगोटी करण्यासाठी जवळपास 74 कोटी रुपये 41 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यांच्याकडे बेस्टला द्यायला पैसे नाहीत, जुन्या पेन्शनसाठी, बोनससाठी पैसे नाहीत. मग या प्रकल्पात होणाऱ्या अतिरिक्त खर्च कशासाठी आणि कुणासाठी. आणि हा घोटाळा नाहिये तर काय आहे.? 23 तारखेला आमचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे, या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी करून आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
काम पूर्ण होण्याआधीच रंग रंगोटी करणे यात कुठला तर्क आहे? मुंबईतल्या अनेक मेट्रोंचे काम पूर्ण झालेले नाही मग त्यांच्यावर रंगरंगोटी करण्याची गरज काय? पण एवढं मोठं कंत्राट आणि त्यावर 74 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च? हे जनतेचे पैसे असून त्यांच्या खोक्यातले पैसे नाहियेत. सरकारकडे सामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत मग हे पैसे कंत्राटदाराच्या खिशात जातात तरी कसे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुंबई आणि महाराष्ट्र प्रभावित करण्यासाठी90 हजार लोक गुजरातहून आले आहेत असे पंकजा मुंडे काल म्हणाल्या. जर राज्यात महाविकास आघाडीचा विजय झाला तर महाराष्ट्र जिंकेल आणि महायुतीचा विजय झाला तर गुजरातचा विजय होईल ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. गुजरातमधून 90 हजार लोक का आलेत महाराष्ट्रातील लोकांना प्रभावित करण्यासाठी? एवढं काय आहे महाराष्ट्रात की गुजरातहून 90 हजार लोकांना इथे भाजपच्या प्रचारासाठी यावं लागलं असेही आदित्य ठाकरे म्हणाले.