मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट

2 hours ago 1

महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली शहरांतही आज प्रचंड वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह प्रचंड पाऊस पडला. तसेच मुंबईत आताही मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे ऑफिसचे कामकाज पूर्ण करुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

कल्याण डोंबिवली पावसाचा जोर कमी, मात्र मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट

कल्याणमध्ये सकाळी ढगाळ वातावरण होते. तर दुपारी कडक ऊन होतं. रात्री आठ वाजता अचानक ढगांच्या आणि विजेच्या कडकडाटासह कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सध्या पावसाचा जोर कल्याणसह मुंबईमध्ये कमी झाला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट कल्याण डोंबिवलीत होत असून रात्री पावसाचा जोर वाढला तर कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अहिल्यानगरमध्ये प्रचंड पाऊस

अहिल्यानगर शहर आणि परिसरात सायंकाळी सात वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दीड ते दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. हवामान विभागाकडून 14 तारखेपर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगरमध्ये आज दिवसभर वातावरणामध्ये प्रचंड उकाडा आणि ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी आलेल्या पावसाने गारवा निर्माण झाला. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रब्बी पिकांसाठी हा पाऊस लाभदायक असून या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.

पालघरमध्ये प्रचंड पाऊस

सलग दुसऱ्या दिवशी पालघर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पालघरच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. परतीच्या पावसाने काढणीसाठी आलेल्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अकोल्यात प्रचंड पाऊस

अकोल्यातल्या बहुतांश भागात काल आणि आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर मागील 24 तासात अकोला जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. जिल्हातल्या मुर्तीजापूर तालुक्यात देखील विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. या दरम्यान वीज पडून शेतात काम करणाऱ्या एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू तर एक महिला जखमी झाली. मृतक हा मध्यप्रदेशमधील रहिवासी होता. तर दुधलम शेतशीवारात सोयाबीन कापणीसाठी आले असता विज पडून या शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. तर अल्पेश बारस्कर असं या मृत तरुण शेतमजुराच नाव आहे. तर जखमी रागिनी आठवा हिच्यावर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर मागील 24 तासात अचानक आलेल्या पावसामूळ शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट आले आहे. तसेच अनेक भागात कापणीला आलेले सोयाबीन पिकांच नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

यवतमाळ शहरात विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस

मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याने घामाच्या धारा लागल्या होत्या. अशातच यवतमाळ शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. तर शेतशिवारात सोयाबीनची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आज झालेल्या पावसामुळे नागरिकांनी सुरक्षित जागेचा आधार घेतला होता.

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात काल सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसाच्या बॅटिंगमुळे सोयगाव तालुक्यातील शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे. सोयगाव तालुक्यातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळीच्या बागेत जमिनीवर तुटून पडल्या, तर सोयाबीन, मका आणि कापूस पिके पाण्याखाली गेली आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागतोय.

कोल्हापुरातही परतीच्या पावसाने

गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. आज कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. सकाळपासून उन्हाचा तडाका जाणवत होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास आलेल्या या पावसामुळे वाहनधारकांची मात्र तारांबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात पतीचा पाऊस कोसळत आहे. याचा शेतीच्या कामावर देखील परिणाम होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची काढणी आणि मळणी कोळंबली आहे. तर जिल्ह्यातील भात पिकाला देखील या पावसाचा मोठा फटका बसतोय.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article